सातारा : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या निसर्गाच्या लहरीपणाचा सोयाबीनला जास्त फटका बसला आहे. शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करीत असताना काटामारी केली जात आहे. ती थांबली नाही, तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा संघटनेने दिला आहे.
काही ठिकाणी सोयाबीन काढणी, तर काही ठिकणी कापणीचे काम सुरू आहे. एकीकडे अस्मानी संकट उभे असताना व्यापारीही सुलतानी लूट करीत आहे.
राज्यात काही ठिकाणी शेतीमाल हमीभावापेक्षा कमी किमतीत खरेदी केला जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. साताऱ्यामध्ये व्यापारी सोयाबीन पिकाची खरेदी करताना मोठ्या प्रमाणात काटा मारत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. एकीकडे या भागातला शेतकरी अतिवृष्टीमुळे हैराण आहे. त्यातच शेतकऱ्यांची अशाप्रकारे होणारी लूट समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न बिकट होत चालले असल्याचे सांगितले जात आहे. प्रकाश साबळे आणि भरत साबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.