लोकमत न्यूज नेटवर्क
वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील जांभूळणी येथील जानुबाई पाझर तलावातून अवैधरित्या रात्रं-दिवस पाण्याचा उपसा सुरु आहे. यामुळे तलावातील पाणीसाठ्यात कमालीची घट होऊ लागली असून, आता ३० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे तलाव कोरडा पडण्याची भीती आहे. तलावातील मासे व परिसरातील जनावरांना ऐन उन्हाळ्यात पाण्यावाचून तडफडण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने पशुपालक व ग्रामस्थांनी या तलावातून अवैधरित्या होणारा पाणी उपसा थांबविण्याची मागणी केली आहे.
माण तालुक्याच्या पूर्व भागात गेल्यावर्षी वरूणराजाने कृपादृष्टी केल्याने अजूनही विहिरी, तलाव, बंधारे यामध्ये पाणीसाठा टिकून आहे. विहिरीतील पाण्यामुळे शेतशिवारातील उन्हाळी पिके टिकून आहेत. मात्र, विहिरींंना चांगले पाणी असतानाही थेट तलावातून विद्युत मोटारींच्या साह्याने अवैधरित्या राजरोसपणे अनेक शेतकरी दररोज लाखो लीटर पाण्याचा उपसा करत आहेत. यामुळे तलावातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली असून, अल्पावधीतच पाणी संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मे महिन्यात उन्हाचा तडाखा वाढणार आहे. गावशिवारासह रानावनात भटकणारे पशू-पक्षी आणि प्राण्यांसाठी विहिरींचे जलस्रोत दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी तलावात पाणीसाठा शिल्लक असणे महत्त्वाचे आहे. पाणी पावसाळ्यापर्यंत पुरविण्यासाठी अहोरात्र होणारा पाण्याचा उपसा थांबवणे गरजेचे आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब कठोर पावले उचलून संबंधित पाणी चोरांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडूूून केली जात आहे.
कोट :
जांभूळणी परिसरातील रानावनात चरणाऱ्या जनावरांना जानुबाई तलाव हा एकमेव आधार आहे. शिवाय गावच्या पाणीपुरवठ्याची विहीर तलावाच्या भरावाखाली आहे. जर तलाव आटला तर संपूर्ण जांभूळणी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरशिवाय पर्याय उरणार नाही.
- नाथा रामा काळेल, ग्रामस्थ, जांभूळणी
फोटो : जांभूळणी (ता. माण) येथील जानुबाई तलावातून अवैध पाणी उपसा सुरु असल्याने, पाणीसाठ्यात घट झाली आहे. (छाया : सिध्दार्थ सरतापे)
.................................................................................................................................................................................................