सातारा : गावातील स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ मुंबईला निघालेल्या लाँग मार्चला पाठिंबा देण्यासाठी ‘रिपाइ’च्या आठवले गटाच्यावतीने साताऱ्यात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी महामार्गावर ठिय्या मांडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता.
याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील एका गावात स्वागत कमान पाडण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ तसेच स्वागत कमान पुन्हा बांधून मिळण्यासाठी ग्रामस्थांनी लाँग मार्च सुरू केला आहे. हा लाँग मार्च शुक्रवारी सकाळच्या सुमारास सातारा शहराजवळ महामार्गावर आला होता. याला पाठिंबा देण्यासाठी ‘रिपाइ’च्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. तसेच यावेळी पोलिस बंदोबस्तही तैनात होता.
पोलिसांच्या आवाहनानंतर जवळपास अर्ध्या तासानंतर आंदोलक बाजुला गेले. तर यानंतर लाँग मार्च मुंबईच्या दिशेने गेला. या रास्ता रोको दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात ‘रिपाइ’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, मातंग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णा वायदंडे, सातारा तालुकाध्यक्ष आप्पा तुपे, स्वप्नील गायकवाड, वैभव गायकवाड, पूजा बनसोडे, अक्षय कांबळे, राजू कांबळे, जावेद सय्यद, प्रतीक गायकवाड, श्रीकांत निकाळजे आदी सहभागी झाले होते.