सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली असून, कोयना धरण परिसरात २४ तासांत काहीच पाऊस झाला आहे. तर धरणातून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. दरम्यान, महाबळेश्वर येथे फक्त चार मिलीमीटर पाऊस झालेला आहे.जिल्ह्यात यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावली. तर पश्चिम भागात जुलै महिन्यापासून सुरू झालेला पाऊस आॅगस्ट महिना संपेपर्यंत सतत सुरू होता. कोयना, बलकवडी, तारळी, धोम, उरमोडी धरण परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणांची पाणीपातळी झपाट्याने वाढली. गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरणे लवकरच भरली. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून वारंवार पाणी सोडण्यात आले.कोयना धरणात गेल्या आठ दिवसांपासून १०४ टीएमसीच्यावर पाणीसाठा आहे. १०५.२५ टीएमसीचे हे धरण भरल्यातच जमा आहे; पण आवक होत असल्याने वारंवार पाणी सोडण्यात आले. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे शून्य मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
गेल्या दोन महिन्यांत प्रथमच येथे पावसाची नोंद झालेली नाही. तर आतापर्यंत कोयनानगर येथे ५२६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणात ४३१५ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. मात्र, धरणाच्या दरवाजा आणि पायथा वीजगृहातून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. सध्या धरणात १०४.०६ टीएमसी इतका साठा आहे.त्याचबरोबर नवजा येथेही सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाची नोंद झालेली नाही. येथे आतापर्यंत ५७९४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर महाबळेश्वरला २४ तासांत ४ तर आतापर्यंत ५०८१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.दरम्यान, जिल्ह्याचा पूर्व भाग अद्यापही कोरडा आहे. गेल्या दोन महिन्यांत दुष्काळी भागात पावसाने जोरदार हजेरी लावलेली नाही. त्यामुळे पाण्याअभावी पीक उत्पादन घटणार आहे. येत्या काही दिवसांत पाऊस झाला तरच शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण राहणार आहे.