सातारा : ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर यांचे स्मारक हे राष्ट्रीय दर्जाचे व्हावे आणि ते तीन एकर २२ गुंठ्यातच व्हावे. मात्र सध्या सात गुंठ्यात सुरू असलेले स्मारकाचे काम आम्हाला मान्य नसून ते थांबवावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल,’ अशी माहिती ‘रिपाइं’चे किशोर तपासे, माजी उपनगराध्यक्ष मुरलीधर भोसले, अंकुश भिंगारदेवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.किशोर तपासे म्हणाले, ‘सध्या असलेली स्मारकाची जागा कोणासही माहिती नव्हती. दलित सेवा संघाने पुढाकार घेऊन ती जागा स्वच्छ केली. सध्या सात गुंठ्यात घातलेला स्मारकाचा घाट मान्य नाही. तसेच स्मारकाची मालकी कोणत्याही एका संस्थेकडे नको. त्यासाठी तीन एकर २२ गुंठे जागा संपादित करण्यात यावी आणि शासनाने स्मारक बांधून देऊन त्याचा ताबा शासनाकडे ठेवावा.’ माजी उपनगराध्यक्ष मुरलीधर भोसले म्हणाले, ‘पार्थ पोळके यांनी तडजोड करून सात गुंठ्यात स्मारक बांधण्याचा घाट घातला आहे. ते म्हणतात, ‘शासनाचा पैसा नको आम्ही बांधू; परंतु तसे झाल्यास त्यांची मालकी राहणार असून, आम्हाला कोणा एका संस्थेच्या मालकी नको आहे. त्यापेक्षा त्यांनी सहकारी तत्त्वावर स्मारक बांधावे. या जागेत प्लॉट पाडून ते धनदांडग्यांना विकण्यात आले आहेत. तिथे गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या तर स्मारकाचे पावित्र्य धोक्यात येईल.खासदार उदयनराजे यांनी डीपीडीसीमधून सात कोटी देण्याचा प्रस्ताव तयार करा, असे जिल्हाधिकाऱ्यांंना सांगितले आहे.’ माजी नगरसेवक अंकुश भिंगारदेवे यांनी पार्थ पोळके यांच्यावर वर्गणी गोळी करून त्याचा अपहार केल्याचा आरोप केला. शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी पोळके यांनी वर्गणी गोळा केली. परंतु ती आजतागयत दिली नाही. तसेच १९८१ मध्ये सातारा बसस्थानकाशेजारील झोपडपट्टी उठवण्यात आली तेव्हा सुध्दा त्यांनी रक्कम गोळा केली. सामाजिक कार्याच्या नावाखाली पोळके हे लोकांना फसवत आहेत, असाही त्यांनी आरोप केला. (प्रतिनिधी)स्मारकाची जागा भीमाबाई प्रतिष्ठानची आहे. स्मारकाचे काम सुरू करताना बांधकाम परवानाही घेतला आहे. स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी याला मान्यता दिली आहे. कोणतेही धार्मिकस्थळ कोणाच्या मालकीचे नसते. हे स्मारक राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणार आहे. वर्गणी अपहराचा आरोप होत असेल तर माझ्यावर फौजदारी करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होऊन ३० ते ३५ वर्षे झाली. एवढी वर्षे गप्प का. झोपडपट्टीतील लोकांचेही जबाब घ्या. यातील वस्तुस्थिती समोर येईल. हे सर्व आरोप श्रेयवादातून होत आहेत.’- पार्थ पोळके
सात गुंठ्यातील काम त्वरित थांबवा
By admin | Published: February 25, 2015 11:25 PM