लोणंद : शहरातील नवीपेठ येथील योगेश ट्रेडर्स ते गवळी ट्रेडर्सच्या गल्लीत बालचमूंनी आपल्या भन्नाट कल्पनाशक्तीचा वापर करून चक्क बंद अवस्थेत असलेल्या एसटीडी बुथमध्ये बाप्पांची प्रतिष्ठापना केली . गणेशोत्सव साजरा करण्याची प्रबळ इच्छा आणि दुसरीकडे पालकांचा टोकाचा विरोध असताना चिमुकल्यांनी बाप्पांची तयारी केली. अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता त्यांनी गणपती बसविण्याचे ठरविले.या गल्लीत शेजारी असणाऱ्या बंद बुथचा वापर करायचा ठरला आणि बालचिमुकल्यांनी हामालांची मदत घेतली आणि तो बुथ पाहिजे तिथे ठेवला आणि गणेशाची प्रतिष्ठापना केली.गणपतीची रोज आरती तसेच संध्याकाळी आठनंतर टिपऱ्या, स्वच्छ भारत, लेक वाचवा लेक जगवा, झाडे लावा, पर्यावरण वाचवा, हुंडाबळी यावर छोट्या नाटिकेद्वारे समाज जागृती परिवर्तनासाठी प्रबोधन करतात. सामान्यज्ञान, चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धाही झाल्या आहेत. या मंडळात केदार गाडे, प्रणव गवळी, आदित्य गवळी, ऋतुजा मासाळ, अविष्कार गायकवाड, रोहित जीनगा, वेदान्त, ईश्वरी, संस्कृती, महिमा, माधवी हे सभासद आहेत. श्रद्धा व पूजा गाडे, शीतल भिसे, संपदा व पूजा दोशी यांनी मार्गदर्शन केले.प्रसिद्धी व प्रतिष्ठेसाठी लाखोंचा खर्च करणाऱ्यांच्या डोळ्यात या चिमुकल्यांनी झणझणीत अंजन घातले आहे. त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. (वार्ताहर)
बंद एसटीडी बुथ बनला बाप्पांच्या प्रतिष्ठापनेचा मंडप
By admin | Published: September 13, 2016 12:33 AM