खटाव : नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उन्हाळी कांद्याला आगामी काळात चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने कांदा चाळीत साठवून ठेवलेला कांदा आता वातावरणातील बदलामुळे खराब होऊ लागल्यामुळे शेतकरी आता मिळेल त्या भावात कांदा विक्री करण्याच्या लगबगीत दिसून येत आहे.
शेतकऱ्यांनी बियाणे मिळवण्यासाठी धडपड करून बियाणे मिळवले, रोपे तयार करेपर्यंत त्यानंतर कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंत नैसर्गिक विविध संकटांना तोंड द्यावे लागले आहे. बहुतांश शेतकऱ्यांची रोपे उगवण्याअधीच खराब झाली. त्यामुळे त्यांना दुबार रोपे तयार करण्यासाठी हाती बिया नसल्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या बियाण्याची मिळेल त्या भावात खरेदी करून पुन्हा रोपे तयार केली. परंतु, त्याचा उगवण क्षमतेवर परिणाम होऊन उत्पादन कमी आले. यातच अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पाऊस यामुळे कांद्यावर करपा रोगाने थैमान घातले. त्यामुळे उत्पादनात घट आल्यामुळे उरलेल्या कांद्याला चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. परंतु, गारपीट व अवकाळी पावसामुळे नरम झालेला कांदा चाळीत टाकल्यानंतर एक ते दीड महिन्यात खराब होण्यास सुरुवात झाली. आता कांदा बाहेर काढून निवडून विक्रीसाठी देण्याच्या गडबडीत कांदा उत्पादक शेतकरी आहेत.
उन्हाळी कांदा लागवडीसाठी महागडे कांदा बी, तणनाशके, रासायनिक खते, रोपांची लागवड कांदा काढणी आदींसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च झाला आहे. त्यातच अगदी शेवटच्या टप्प्यात अवकाळी पाऊस व रोपांवर पडलेल्या करपा रोगामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. उरलेल्या कांद्याला चांगला दर मिळेल, या अपेक्षेपोटी बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा चाळीत भरला होता. बऱ्याच दिवसांपासून कांद्याचा भाव स्थिर आहे.
कोट..
सध्या १८ रुपयांनी कांदा मार्केटमध्ये खरेदी केला जात आहे. तर किरकोळ बाजारामध्ये २२ ते २५ रुपयांप्रमाणे विकला जात आहे. चाळीतील कांदा वास्तविक ऑगस्ट महिन्यापर्यंत चाळीत सुरक्षित राहतो; परंतु अवकाळी पावसामुळे कांदा पिकावरदेखील परिणाम झाल्यामुळे साठवून ठेवलेला चाळीतील कांदाही खराब होत आहे. कांदा भरणीवेळी खराब निघत आहेत.
- हणमंत यादव, कांदा व्यापारी
फोटो कॅप्शन : खटाव तालुक्यात शेतकरी कांदा चाळीतून निवडक कांदा भरून ठेवत आहेत. (छाया : नम्रता भोसले )