प्रमोद सुकरे - कऱ्हाड ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ ही इसापनीतितील कथा आजही तितक्याच आवडीने सांगितली अन् ऐकली जाते; पण कऱ्हाडच्या राजकीय पटलावर ज्येष्ठ विरोधी नगरसेवक विनायक पावसकर यांनी पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधताना ‘अलीबाबा अन् वीस चोर’ असा हल्ला चढवला; पण त्या दिवसापासून शहरात ‘अलीबाबा’ कोण आणि ‘वीस चोर’ कोण, याची उलटसुलट चर्चा सुरू आहे. कऱ्हाड नगरपालिकेत गेल्या तीन वर्षांपासून आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘लोकशाही’ आघाडी सत्तेत आहे. आघाडीचे नेतृत्व सुभाष पाटील करतात म्हणे; पण इथं नावात ‘लोकशाही’ अन् कृतीत ‘हुकूमशाही’ असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. विरोधकांच्या प्रभागात विकासकाम होईना तर वाखाण परिसरात ‘वाखाण’ण्यासारखे काम सुरू असल्याचे ते सांगतात. चोवीस तास पाणी योजनेचे ‘बजेट’ डोईजड होत चालले आहे; पण प्रत्यक्षात कऱ्हाडकरांना अनेकदा कृष्णेचे दूषित पाणीच प्यावे लागत आहे. शुद्धीकरणासाठी त्यात क्लोरीन टाकले जाते. मात्र, या कऱ्हाडच्या राजकारण शुद्धीकरणाठी कोणते औषध वापरायचे, हे दस्तुरखुद्द कऱ्हाडकरांनाच समजेना. शहरात सुरू असणाऱ्या विकासकामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत गत आठवड्यात ‘लोकशाही’च्या विरोधात ‘जनशक्ती’ रस्त्यावर उतरली; पण ‘जनशक्ती’ला ‘शक्ती’प्रदर्शन मात्र करता आले नाही. मग या नगरसेवकांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनाही घेराव घातला; पण त्यातून निष्पन्न काही झाले असावे, असे वाटत नाही. एक गोष्ट मात्र खरी, त्या दिवसापासून शहरात ‘अलीबाबा’ कोण अन् ‘वीस चोर’ कोण, याची चर्चा मात्र रंगू लागली आहे. ‘तो मी नव्हेच’ पालिकेत सत्ताधाऱ्यांचे तेवीस नगरसेवक आहेत. तर विरोधकांनी आरोप करताना वीस चोर असा केला आहे. त्यामुळे ते ‘वीस’ कोण याचा शोध घेताना प्रत्येक नगरसेवक ‘तो मी नव्हेच’ची भूमिका बजावत आहे. कऱ्हाडकर मात्र त्या ‘अलीबाबा’ आणि ‘वीस चोरां’चा शोध घेत आहेत. अलीबाबा कोण ? विरोधकांनी अलीबाबा अन् वीस चोर, असा उल्लेख केल्याने पालिकेतील अलीबाबा कोण याबाबतही लोकांना उत्सुकता आहे. तर पालिकेत काहीजण खासगीत मी अलीबाबा आहे, असे सांगत असल्याचे समजते. नगरपालिका म्हणजे एक गुहा आहे. नगरसेवक प्रयत्न करून शहराच्या विकासासाठी निधी आणतायत. एक ‘अलीबाबा’ येतोय. ‘खुल जा सिमसिम’ म्हणतोय, आणि सारा निधीच घेऊन जातोय. अशी सध्या कारभाराची परिस्थिती आहे. म्हणून मी टीका केली. त्या अलीबाबाचा नागरिकच शोध घेतल्याशिवाय राहणार नाहीत. - विनायक पावसकर, ज्येष्ठ नगरसेवक, जनशक्ती आघाडी विरोधकांनी केलेली टीका मी ऐकलेली नाही; पण जर का अशी टीका विरोधक करीत असतील तर त्यांना योग्यवेळी योग्य ते उत्तर आम्ही देऊ. सध्या मला यावर काही भाष्य करायचे नाही. - जयवंत पाटील, ज्येष्ठ नगरसेवक, लोकशाही आघाडी
‘अलीबाबा.. वीस चोरांची’ कहाणी कऱ्हाडात रंगली! राजकीय पटलावर
By admin | Published: February 23, 2015 11:19 PM