सातारा : कण्हेर धरणाच्या भिंतीवर शनिवारी आढळून आलेल्या मगरीच्या पाठीवर बसून ‘सेल्फी’ काढून तिचा छळ केल्याप्रकरणी वन विभागाने एका युवकाला अटक केली. विजय विठ्ठल भगळे (वय ३४, रा. कण्हेर, ता. सातारा) असे त्याचे नाव आहे. याबाबत ‘लोकमत’ने पहिल्या दिवसापासून केलेल्या पाठपुराव्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाल्याने प्राणीमित्रांमधून कौतुक होत आहे.सातारा-महाबळेश्वर रस्त्यावरील कण्हेर धरणाजवळ सोमवारी (दि.१८) सात फुटी मगर आढळून आली होती. काही तरुणांनी या मगरीच्या पाठीवर बसून अन् तिला दोरीने बांधून डिवचण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चवताळलेल्या मगरीच्या हल्ल्यात कडव नामक (रा. साबळेवाडी) तरुण जखमी झाला. या मगरीला पकडून वन विभागाने सोमवारी (दि. १८) रात्री पश्चिम घाटातील तिच्या अधिवासात सोडून दिले.कण्हेर धरणाजवळ मगर पाहण्यासाठी आलेल्या तरुणांपैकी काहींनी मगरीच्या पाठीवर बसून तिला डिवचण्यात धन्यता मानली होती. विजय विठ्ठल भगळे या युवकानेही मगरीच्या पाठीवर बसून सेल्फी काढला होता. या ‘सेल्फी’चा व्हिडिओ ‘लोकमत आॅनलाईन’वर झळकताच सतर्क झालेल्या वन विभागाने बुधवारी विजय भगळे या युवकावर वन्यजीव अधिनियम १९७२ कलम ९ अन्वये कारवाई करून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. जिल्हा उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, सहायक वनसंरक्षक ए. एल. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल महेश पाटील, वनपाल जी. एस. भोसले, वनरक्षक मारुती माने, दीपक गायकवाड, प्रशांत पडवळ, कृष्णा पवार यांनी ही कारवाई केली.
मगरीची पाठ ठरली भलतीच ‘काटेरी’--सेल्फी काढणाऱ्या तरुणाला अटक
By admin | Published: July 21, 2016 12:53 AM