प्रमोद सुकरेकऱ्हाड : विरवडे (ता. कऱ्हाड) येथील ग्रामपंचायतीच्या अजब कारभाराचे गजब नमुने समोर येऊ लागले आहेत. या ग्रामपंचायतीचे कारभारी गेल्या अनेक वर्षांपासून अनाधिकाराने ओगलेवाडी गावठाणात घुसखोरी करीत आहेत. ओगलेवाडी गावठाण स्वतंत्र असतानाही तेथे हस्तक्षेप करीत बांधकाम परवाने देणे, त्याच्या नोंदी धरणे व करवसुली करणे हे त्यांचे काम जोरात सुरू आहे. याकडे प्रशासन लक्ष देणार का? हा खरा प्रश्न आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, विरवडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतून सन १९७४ साली ओगलेवाडी हे गावठाण विभक्त करण्याबाबत शासनाने अधिसूचना जाहीर केली होती. त्यानुसार १९७५ साली त्याचे गॅझेट (राजपत्र) झाले. त्यानंतर ‘कमी-जास्त पत्रक’ प्रसिद्ध होऊन विरवडेतून ओगलेवाडीचे काही सर्व्हे नंबर कमी करण्यात आले.
असे असतानाही विरवडेचे ग्रामपंचायत कारभारी ओगलेवाडी गावठाणावरील हक्क सोडताना दिसत नाहीत. स्वतंत्र गावठाण मंजूर होऊनही आजपर्यंत येथील बांधकाम परवाने देणे, त्याच्या नोंदी धरणे, तेथील करवसुली करणे यांची कार्यवाही सुरूच आहे.
वास्तविक करवडी फाटा ते एमएसईबी रस्ता, धोकटेमळा हे क्षेत्र विरवडेतून वगळण्यात आले आहे. मग येथे बांधकाम परवाने देण्याचा, तेथील नोंदी करण्याचा व करवसुलीचा अधिकार ग्रामपंचायतीला कसा उरतो? हा प्रश्नच आहे; पण त्यांना जाब कोण विचारणार?
ओगलेवाडी गावठाण का विभक्त केले?
सन १९२३ मध्ये ब्रिटिश सरकारने ओगले ग्लास कंपनीला यातील सुमारे १४ एकर क्षेत्र दिले होते. त्याच वेळी या क्षेत्राला ब्रिटिश सरकारने गावठाणाचा दर्जा व त्याचे अधिकार लिखित स्वरूपात बहाल केले आहेत. त्याचाच आधार घेऊन सन १९७५ साली महाराष्ट्र सरकारने पुन्हा गॅझेट करून त्यावर गावठाण म्हणून शिक्कामोर्तब केले आहे.
ओगलेवाडी गावठाणात कशाचा समावेश ?ओगलेवाडी गावठाण म्हणून नेमका कशाचा समावेश केला आहे याची माहिती घेतली. करवडी फाटा ते एमएसईबी रस्ता यादरम्यानचे सर्व्हे नंबर ४३ ते ५१ व ७२ ते ८२ यांचा समावेश ओगलेवाडी गावठाणात गॅझेटप्रमाणे करण्यात आलेला आहे. मात्र तरीही येथे विरवडे ग्रामपंचायतीचा हस्तक्षेप सुरू दिसतो.
सामिलीकरण व विभाजनाचे ही प्रकार?खरं तर एखाद्या क्षेत्राचे सामिलीकरण किंवा विभाजन करणे हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. असे असतानाही विरवडे ग्रामपंचायतीने सामिलीकरण व विभाजनाचे अनेक प्रकार केले असल्याचे सांगितले जात आहे.
विरवडे ग्रामपंचायतीला ओगलेवाडी गावठाणात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही; कारण ओगलेवाडी गावठाण हे स्वतंत्र आहे. तरीदेखील विरवडे ग्रामपंचायत बेकायदेशीरपणे हस्तक्षेप करीत आहे. त्या विरोधात प्रशासकीय पातळीवर अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्याची दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे आता न्यायालयात दाद मागणार आहोत. - मुकुंद पाटील (ओगलेवाडी)