लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोविडमुळे वर्षाहून अधिक काळ घरात राहणे, सण-समारंभ-उत्सव साजरीकरण नसल्याने संपुष्टात आलेल्या सार्वजनिक आयुष्याचा गंभीर परिणाम बालमनांवर होऊ लागला आहे. समाजात मिसळण्याची प्रक्रिया थांबल्याने मुलांमध्ये ‘स्ट्रेंजर फोबिया’चे प्रमाण वाढू लागले आहे. ऑनलाइन फॅमिली गेटटुगेदर आणि मित्र परिवारासह केलेले डबल बबल असे काही पर्याय यासाठी उपयुक्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
कोविडच्या आगमनाने चिमुकल्यांच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली आहे. त्यांच्यात रोज तयार झालेली ऊर्जा खर्ची पडत नसल्याने आलेली अस्वस्थता या मुलांना व्यक्त करता येत नाही. वर्षानुवर्षे सुरू असलेले रुटीन अचानक बिघडल्याने त्यावर कसे व्यक्त व्हायचे हा त्यांच्या समोरचा मोठा प्रश्न आहे. गेल्या दीड वर्षात सार्वजनिक वावर कमी झाल्याने घरात कोणी आले तर त्यांना सामोरे जाण्याची तयारी मुलांमध्ये दिसत नसल्याचे आढळून येत आहे.
कोविड काळ कठीण असला तरी ‘हे दिवसही निघून जातील’ हा मोठ्यांचा आशावाद चिमुकल्या मनात पेरणे आवश्यक आहे. यासाठी कुटुंबाने एकत्र बसून गप्पा मारणे, कोविडची भीती दाखवताना आपल्याला याचा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, यावर सकस चर्चा होणे अपेक्षित आहे. यासह भविष्यात नियोजित असलेल्या गोष्टींबाबत मुलांच्या मनात आस निर्माण करणे आणि जास्तीत जास्त संवाद राखणे महत्त्वाचे आहे.
चौकट :
उलटपुलट वागणे देतेय संकेत!
भावनिक उलथापालथ आणि मानसिक सक्षमतेचे प्रत्येकाचे प्रमाण वेगवेगळे असते. येणाऱ्या संकटाला तुमचे मन आणि मेंदू कसे सामोरे जातो, याचे दोन प्रकार आहेत. हेल्दी आणि अनहेल्दी कोपिंग असे म्हणतात. जी मुले परिस्थितीशी जुळवून घेऊन सकारात्मकतेने विचार करतात, त्यांना हेल्दी कोपिंग क्षमता म्हणतात. कुटुंबात वाढणारे मूल त्याच्या सवयीप्रमाणे वागणे सोडून बदलू लागले, तर पालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. यात शांत असणारी मुले अचानक चिडचिडी होणे किंवा दंगा कारणारी मुले अचानक अबोल झाली, तर त्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक ठरते.
भोवतालच्या वातावरणाचाही होतोय परिणाम
गेल्या काही महिन्यांत कोविडने प्रत्येक कुटुंबात शिरकाव केला आहे. औषधी, दवाखाना, त्यासाठी करावी लागणारी धावपळ, अचानक ओढवणारा मृत्यू या सर्वांचीच मुलांच्या मनावर भीती आहे. आपल्या कुटुंबातील कोणी गेले, तर लहान मुलांना कोविड धोक्याचा आहे, म्हणजे आपण मरणार, असे प्रश्न त्यांच्या मनात डोकावू लागले आहेत. कुटुंबीयांना हे प्रश्न विचारून त्यांना गोंधळात टाकण्यापेक्षा ही मुले स्वत:च प्रश्नांची उत्तरे शोधत बसतात आणि अधिक नैराश्याकडे जात असल्याचेही पाहण्यात आले आहे.
कोट :
कोविड काळात मुलांना पालकांचा जास्तीत जास्त सहवास मिळाला, ही जमेची बाजू आहे; पण पालकांच्या आयुष्यात डोकावणाऱ्या ताणाचे दुष्परणिाम या मुलांवर दिसत आहेत. यावर जास्तीत जास्त संवादातून मार्ग काढण्याचा पर्याय सर्वोत्तम आहे.
- डॉ. देवदत्त गायकवाड, सातारा
..........