वेळे /सातारा : पुणे ते सातारा या महामार्गावर कवठे ते भुईंज या दरम्यान अनेक स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी व किरकोळ व्यापारी यांनी स्ट्रॉबेरी विक्रीच्या नावाखाली महामार्गावरच आपले दुकान थाटून व्यवसायाची थट्टा चालवली आहे. सेवा रस्ता व महामार्ग यांच्या मधल्या जागेत राजरोसपणे बिन भाड्याच्या जागेत हा धंदा अनेक वर्षांपासून चालू आहे. मात्र या अशा धद्यांमुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना व वाहन धारकांना जीवाची जोखीम पत्करून प्रवास करावा लागत आहे.कवठे ते भुईंज दरम्यानच्या रस्त्यालगत अनेक शेतकरी स्ट्रॉबेरी पिकाचे उत्पादन घेतात. मात्र ती विकण्यासाठी त्यांनी महामार्गावरच आपला स्वतंत्र असा अड्डा निर्माण केला आहे. या शेतकऱ्यांबरोबरच किरकोळ विक्री करणारे व्यापारीही हा धंदा करीत आहेत.
जवळपास शेकडोजण आपल्या जीवासह इतरांच्या जीवाशी खेळत हा धंदा अगदी सहजतेने करीत आहेत. त्यांना ना पोलीस प्रशासनाची धास्ती ना महामार्ग प्राधिकरणाची. स्ट्रॉबेरीची चव अगदीच मस्त असली तरी ती विकणारे व विकत घेणार यांना जीवाची धास्त राहिलेली नाही, असेच दिसून येते.राष्ट्रीय महामार्गावर कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होवू नये, अशी प्रशासनाची भूमिका असताना देखील या ठिकाणी मात्र अडथळ्यांचा सामना हा रोजच्या वाहन धारकांना व प्रवाशांना होताना दिसत आहे. हे स्ट्रॉबेरी विक्रेते आपला माल विकून चरितार्थ चालवितात, मात्र अशा वेळी काही अघटीत घटना घडली तर तर त्यास हे जबाबदार राहतील का? कवठे ते भुईंज या दरम्यानचा महामार्ग हा चढ व उताराने बनलेला आहे.
अशा वेळी एखादे वाहन ही स्ट्रॉबेरी विकत घेण्यासाठी थांबले असता पाठीमागून येणाऱ्या वाहनाला अंदाज आला नाही तर या ठिकाणी भयंकर अपघाताची शक्यता कोणीही नाकारू शकत नाही. अशा परिस्थितीत चूक नक्की कोणाची? स्ट्रॉबेरी विकणाऱ्यांची की विकत घेणाऱ्यांची? मग याला जबाबदार कोण? असे एक ना अनेक सवाल काळजाला भिडत जातात.सेवा रस्ते व महामार्ग ही राष्ट्रीय संपत्ती असून त्यावर कोणीही आपली हुकूमत गाजवू नये. याचा नाहक त्रास इतरांना होतो. आपले जे काही उत्पादन विक्रीसाठी ठेवायचे असेल ते कोणालाही त्रास होणार नाही अशा ठिकाणी ठेवावे. स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी भरपूर खर्च येतो. ती विकुनच शेतकरी आपला खर्च भागवतो. मात्र ती विकण्याची जागा ही महामार्ग न्हवे, हेही लक्षात घेतले पाहिजे.आता या महामार्गावरील विक्रेत्यांसंदर्भात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून समज दिली जाते की त्यांचेवर कोणती कारवाई केली जाते हे पाहणे गरजेचे आहे. तसेच महामार्ग पोलीस याकडे कोणत्या नजरेने पाहतात हे देखील अत्यंत महत्वाचे आहे.