सातारा : सातारा शहरात भटक्या श्वानांची संख्या वाढत असून ती हजारोंच्या घरात पोहोचली आहे. या श्वानांकडून नागरिकांवर हल्ले करण्याच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. असे असतानाही पालिका प्रशासनाकडून निर्बिजीकरण मोहीम राबविली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पालिका प्रशासनाने २०१६ मध्ये भटक्या श्वानांना पकडण्यासाठी डॉग व्हॅनचा विषय मंजूर केला होता. मात्र हा विषय आजअखेर केवळ कागदावरच आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी पालिकेने श्वानांच्या निर्बिजीकरणाची मोहीम हाती घेतली. एका संस्थेशी करार करून पालिकेने शहरात राबविलेली ही मोहीम अर्ध्यावरच थंडावली. निर्बिजीकरणासाठी पालिका लाखो रुपयांची तरतूद करते. मात्र, हा विषय आजतागायत गांभीर्याने न घेतल्याने शहरात भटक्या श्वानांची संख्या अन् त्यांची दहशत वाढू लागली आहे.
(चौकट)
या भागात सर्वाधिक भीती...
सातारा शहरात व उपनगरांतील भटक्या श्वानांच्या संख्या २५ हजारांहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. यापैकी सदरबझार, लक्ष्मी टेकडी, माजगावकर माळ, माची पेठ, करंजे, मोरे कॉलनी, समर्थ मंदिर परिसर या भागात श्वानांची संख्या सर्वाधिक आहे.
(चौकट)
दररोज चार तक्रारी
भटक्या श्वानांकडून नागरिकांवर हल्ले करण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. या श्वानांचा बंदोबस्त करण्याच्या दररोज तीन ते चार तक्रारी नागरिकांकडून पालिकेत दाखल केल्या जात आहेत. पालिकेने ही बाब गांभीर्याने घेऊन सर्वसाधारण सभेपुढे निर्बिजीकरणाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला आहे.
(चौकट)
पालिकेची मोहीम
अर्ध्यावरच थंडावली
गेल्या पाच वर्षांत पालिकेने केवळ एकदाच श्वानांचे निर्बिजीकरण केले. एका श्वानाच्या निर्बिजीकरणासाठी सुमारे एक ते दीड हजार रुपये खर्च आला. ही मोहीम अर्ध्यावरच बंद पडल्याने पालिकेचे लाखो रुपये पाण्यात गेले. यानंतर मात्र, निर्बिजीकरणाचा विषय केवळ कागदोपत्री मंजूर करण्यात आला. त्याची प्रत्यक्ष अंमजबजावणी अद्यापही झाली नाही.
(पॉईंटर)
१५०० : रुपये खर्च येतो एका श्वानाच्या नसबंदीसाठी
० : अद्याप एकाही कंपनीला कंत्राट दिले नाहीत