पाटण : पांढरेपाणी, ता. पाटण या गावातील रस्त्यावर विजेच्या खांबावरील दिवे बंद आहेत. बंद असलेल्या या दिव्यांमुळे पांढरपाणी गावात सायंकाळनंतर अंधार असतो. तर असणारे दिवेही उशिरा लावले जात आहेत. विजेचे दिवे लावण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.
पाणी पातळी खालावली
कार्वे : कऱ्हाड तालुक्यात कार्वे परिसरातील कोरेगांव, टेंभू, वडगाव हवेली, शेणोली शिवारातील डोंगरी विभागात विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे शेती पंप तास अर्धा तासच चालत आहेत. पाणी कमी असल्यामुळे विभागातील बागायती पीक क्षेत्रास पाणी पुरवठा अपुरा पडणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तुळसण मार्गावर खड्डे
उंडाळे : उंडाळे विभागातील उंडाळे ते तुळसण फाटा या मार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून पाईपलाईनसाठी रस्त्यामध्ये चर काढण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही बांधकाम विभागाकडून दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. उंडाळे ते तुळसण फाटा हा रस्ता शेतकऱ्यांनी आपली जमीन देऊन केला आहे.
उन्हाचा तडाखा वाढला
कऱ्हाड : शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये सध्या वातावरणात प्रचंड उष्णता निर्माण झाली आहे. त्यामुळे या वाढलेल्या तापमानाचा नागरिकांना चांगलाच चटका बसत आहे. मध्यंतरी वळीव पावसाने हजेरी लावली. चक्रीवादळामुळेही पाऊस झाला. मात्र, सध्या मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत असून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.