सातारा : ‘माणुसकी अजून जिवंत आहे,’ असं अभिमानानं सांगितलं जातं. ते खरं असेलही; पण घटनांमुळे ते खोटं वाटू लागते. मालक पाळलेल्या गायींना चरण्यासाठी सोडून देतात. दिवसभर दारोदार फिरूनही त्यांना अन्न मिळत नाही. वाहतुकीला अडथळा होतोय म्हणून पोलिसदादा अन् भाजी मंडईत विक्रेते हाकलून देतात. यातूनच शहरातील गायींनी अन्नासाठी सोनगाव कचरा डेपोचा रस्ता निवडला आहे. मुक्या जनावरांवर प्रेम करा, अशी शिकवण संतांनी दिली आहे. अनेक ठिकाणी दारावर आलेल्या गायींना भाकर, चपाती खाण्यासाठी दिली जाते. काही ठिकाणी या गायींनाही सवयच लागलेली आहे. ठरलेल्या वेळेला त्या दारावर येतात. घरातील माउली किंवा मुलंही लगेच खाण्यासाठी भाकर, काही वेळेस धान्य आणून देतात. त्यामुळे गायींचं पोटही भरतं. इतरांच्या शेतात जाऊन पिके खाण्याची वेळही त्यांच्यावर येत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येक सजीव प्राणी धडपडतो. पण समाजाने झिडकारले तर मात्र, ज्याची त्यालाच सोय करावी लागते. गायींच्या बाबतीतही काहीसं असंच घडत आहे. अनेक गायींचे मालक गायीच्या चरण्याची, सांभाळण्याची जबाबदारीच उचलत नाही. सकाळी आठ वाजले की त्यांना चरण्यासाठी गावात सोडून दिले जाते. तीच अवस्था भटक्या गायींची आहे. उन्हाळा सुरू होत आहे. त्यामुळे डोंगरावरचं गवत वाळून चाललं आहे. त्या अन्नासाठी दारोदार गेल्या तरी अनेकदा अन्न मिळत नाही. मंडईत गेल्या तर तेथील शेतकरी, भाजी विक्रेते किंवा ग्राहक त्यांना हाकलून लावतात. मग भुकेने व्याकूळ होऊन रस्त्यावर थांबल्या तर वाहनचालक किंवा पोलिस हाकलून लावतात. यावर गायींनीच मार्ग काढला आहे. आता अनेक गायी शहरात दिसतच नाही. सकाळ झाली की त्यांची पावले बोगद्याच्या दिशेने वळायला लागलात. सातारा राजवाड्यापासून सुमारे चार किलोमीटरवर असलेल्या कचरा डेपोत जाऊन मिळेल ते खाऊन गायी सध्या पोट भरत आहेत. त्याठिकाणी त्यांना हाकलून देणारे कोणीही नसल्याने दिवसभर त्या तेथेच असतात. सायंकाळचे पाच वाजल्यावर त्या पुन्हा घरी जाण्यासाठी शहराकडे येत आहेत. गायींच्या मालकांनीच त्यांना सांभाळण्याची किंवा खाण्यापिण्याची सोय करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. (प्रतिनिधी) प्लास्टिक, ब्लेडचे पान खाण्यात दरम्यान, नुकतेच एका गायीने कचऱ्यातून ब्लेडचे पान खाल्ले होते. उपचारादरम्यान या गायीचा मृत्यू झाला. त्यामुळे या कचरा डेपोतून त्यांना पोटभरून अन्न मिळत असले तरी दुसरीकडे एखादी दुर्घटना होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
माणुसकीहीन काही मंडळींनी दाखविला कचरा डेपोचा रस्ता
By admin | Published: March 06, 2017 11:47 PM