मलकापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लागू केलेले निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. येथील शिवछावा चौकासह शहरात पोलिसांनीही कडक अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. गुरुवारी रात्री आठपासून या कठोर निर्बंधानुसार शिवछावा चोकातून ये-जा करणाऱ्या वाहनांसह नागरिकांची कसून चौकशी करूनच पोलोस सोडत होते. विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
‘ब्रेक द चेन’ हा शासनाने पंधरा दिवसांचा अंशतः लॉकडाऊन केला आहे. पोलीस व पालिकेच्या संयुक्त पथकाने गुरुवारी शहरात गर्दीची चाहूल लागताच, शहरात फिरून कारवाईची धडक मोहीम राबविली. शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानांमध्ये पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई केली आहे. गुरुवारपासून तर शासनाने आणखी कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या कठोर अंमलबजावणीसाठी पोलीस उपाधीक्षक डॉ.रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्या सुचनांनुसार गुरुवारी रात्री पोलीस कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे.
कोरोनाची साखळी खंडित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शासनाच्या या कडक निर्बंधांची गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासूनच कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. शहरात येणाऱ्यांसाठी कडक उपाययोजना करत, येथील शिवछावा चौकात पोलिसांनी चेकनाका लावला आहे. या ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांसह नागरिकांची कसून चौकशी केली जात आहे.
चौकट
सहा ठिकाणच्या नाकाबंदी
मलकापूरमध्ये प्रामुख्या सहा ठिकाणी तपासणी केली जात आहे. यामध्ये मलकापूर फाटा, मलकापूर जुनी मंडई, शिवछावा चौक, आगाशिवनगर परिसर, बैलबाजार रस्ता, कोल्हापूर नाका.
चौकट
शंभरवर दुचाकी जप्त
शिवछावा चौक, मलकापूर फाटा नाकाबंदीस अधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन शहर पोलिसांनी योग्य कारणाशिवाय फिरणाऱ्या चालकांकडून शंभर दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत, तर अनेक जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
फोटो :
शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांनुसार गुरुवारी रात्री मलकापुरातील शिवछावा चौकात पोलीस प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करत होते. (छाया : माणिक डोंगरे)