सातारा : ‘जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी,’ अशी सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केली.
येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा बोलत होते. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, विस्तार अधिकारी संदीप दीक्षित यांच्यासह ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा म्हणाले, ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी सर्वांनीच मास्कचा वापर करावा. तसेच शासनाने केलेल्या सूचनेनुसार सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा. सर्व ग्रामपंचायतींमध्ये गावस्तरीय व कृती समिती निर्माण करावी. ग्रामपंचायतीमार्फत निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळावी.’
उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे म्हणाले, ‘सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये तसेच तोंडाला मास्क नसल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात यावा. कारवाईची मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करावेत.’
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील म्हणाले, ‘काही दिवसांमध्ये ग्रामीण भागात पुणे-मुंबईहून नागरिक येऊ शकतात. त्याचबरोबर गावातीलच लोकांना विलगीकरणात ठेवण्याची वेळ आल्यास त्यांच्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर सांस्कृतिक हॉल, सामाजिक सभागृह, जिल्हा परिषद शाळा आदी ठिकाणी विलगीकरण केंद्राचे नियोजन करावे.’
फोटो दि.२९सातारा झेडपी कोरोना फोटो...
फोटो ओळ : सातारा जिल्हा परिषदेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अविनाश फडतरे उपस्थित होते.
.................................................