पुसेगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पुसेगाव येथील केवळ मेडिकल व दवाखाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या कालावधीत गावाला जोडणारे अंतर्गत रस्ते देखील बंंद ठेवले जाणार आहेत. मात्र खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतीशी निगडीत दुकाने सकाळी ७ ते ११ या कालावधीत सुरू राहणार आहेत.
‘माझे गाव माझी जबाबदारी’ या अंतर्गत पुसेगावात ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी सकाळी १०.३० वाजता ग्रामदक्षता समितीची बैठक पार पडली. या बैठकीला सरपंच विजय मसणे, उपसरपंच पृथ्वीराज जाधव, ग्रामसेवक काझी, तलाठी गणेश बोबडे, आरोग्य सहायक प्रशांत भोसले, पोलीस हवालदार सुनील अब्दागिरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामदक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते.
सध्या पुसेगावात होम आयसोलेशनमध्ये १४ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. तसेच कोरोनाबधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची माहिती पंचायत समितीच्या माध्यमातून शिक्षकांच्या वतीने संकलित केली जाणार आहे. पुसेगावातील एकही व्यक्ती बाहेर जाणार नाही व आसपासच्या गावातील एकही व्यक्ती पुसेगावात येणार नाही यासाठी गावातील सर्व छुपे व अंतर्गत रस्ते बंद करण्यात येणार आहेत. तसेच ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण व कुटुंब आहे तो पूर्ण भाग प्रतिबंधित करण्यात येणार आहे.
रविवार, दि. २० पर्यंत केवळ मेडिकल व दवाखाने सुरू ठेवण्यात येणार असून, सर्वच दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतीशी निगडीत असणारी दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत खुली राहणार असून, सायंकाळी ५ वाजेपर्यंत घरपोच सेवा उपलब्ध करण्यास मुभा देण्यात आली आहे. प्रांतांच्या आदेशानुसार जर इतर कोणत्याही दुकानदारांनी नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
(कोट)
सध्या पुसेगावमधील १४ रुग्ण कोरोनाबाधित असून संस्थात्मक विलीगीकरणात १० ते १२ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ७० रुग्णांची क्षमता असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये ४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी होत असून, येत्या सात आठ दिवसांत पुसेगाव कोरोनामुक्त होईल.
- डॉ आदित्य गुजर, वैद्यकीय अधिकारी