पुसेगाव : खटाव तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या जिहे-कटापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी नेर धरणात पडण्याआधीच रामोशीवाडी (ता. कोरेगाव) येथील नागरिकांकडून केवळ राजकीय आकसापोटी एअर व्हॉल्व्हच्या माध्यमातून पाणी चोरले जात आहे. संबंधित विभागाने खटावच्या दुष्काळी भागाच्या आरक्षित पाणी चोरीला आळा घालावा, ७ दिवसांच्या आत संबंधित व्हॉल्व्ह कायमस्वरूपी बंद करावा व नेर तलावात तातडीने पाणी सोडावे, या मागणीसाठी पुसेगाव, खटाव जिल्हा परिषद गटातील तसेच तालुक्याच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात आला.खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील महिलांसह शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत पुसेगावातील छत्रपती शिवाजी चौकात भरउन्हात दोन तास ठिय्या आंदोलन करत पाणी चोरण्यास फूस लावणाऱ्या राजकीय नेते मंडळींचा निषेध व्यक्त केला. खटाव तालुका पाणी बचाव समितीच्या वतीने या ‘बंद’ची हाक देण्यात आली होती. त्यानुसार पुसेगाव, खटाव, बुध, डिस्कळ, अशा मोठ्या गावांसह सर्वच गावांतील अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. सकाळी १० वाजल्यापासून पुसेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आसपासच्या गावातील शेतकरी, महिला मोठ्या संख्येने आल्याने चौकात गर्दी झाली.‘पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं,’ अशी घोषणाही यावेळी करण्यात आली. कोरेगाव तालुक्यातील नागरिकांना जिहे-कटापूर योजनेच्या पाण्याची चोरी करण्यासाठी फूस लावणाऱ्या ‘त्या’ राजकीय नेत्याचा जोरदार निषेध केला. काही शेतकऱ्यांनी मनोगते व्यक्त केली.खटाव तालुका जिहे-कटापूर पाणी बचाव समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या योजनेचे उपअभियंता मयूर महाजन यांना निवेदन दिले. त्यानुसार या भागातील शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या सात दिवसांत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर या योजनेचे टेस्टिंग होत असल्याने एअर व्हॉल्व्ह सुरू ठेवला आहे. मात्र यानंतर तो बंद करण्याचे आश्वासन महाजन यांनी दिले.यापुढे हातात दांडके घेऊन आंदोलन तीव्र करू...जिहे-कटापूर योजनेचे पाणी केवळ खटाव व माण या दुष्काळी तालुक्यासाठी आरक्षित आहे. मात्र या पाण्याची चोरी करण्यासाठी फूस लावून कोरेगाव तालुक्यातील राजकीय नेता गावागावांत भांडण लावण्याचा प्रयत्न करून स्वतः राजकारणाची पोळी भाजून घेत आहे. आज शांततेत आंदोलन केले आहे; मात्र यापुढे हातात दांडके घेऊन पुढचे आंदोलन अधिक तीव्र करून ‘त्या’ राजकीय नेत्याला चांगलाच धडा शिकवला जाईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी जाहीर भाषणातून दिला.
Satara News: जिहे-कटापूर पाणी चोरीच्या निषेधार्थ खटाव तालुक्यात कडकडीत बंद, शेतकरी आक्रमक
By प्रशांत कोळी | Published: March 10, 2023 6:50 PM