पळशी : माण तालुक्यातील मार्डीसह परिसरात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या धास्तीने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. त्यामुळे सर्वानुमते सात दिवस मार्डी गावातील सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
मार्डी व परिसरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून वाड्या-वस्त्यांवरदेखील रुग्ण वाढत आहेत. मार्डी हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने शेजारील गावांतील ग्रामस्थ बाजारहाटसाठी येत असतात. त्यामुळे गावपरिसरात रुग्ण वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी गावातील आपत्ती व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत प्रशासनाने ३० एप्रिल ते ६ मेपर्यंत स्वयंस्फूर्तीने मेडिकल व दवाखाने वगळता सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे. कोणीही विनाकारण फिरताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
सर्वांनी मास्कचा वापर करावा व तातडीच्या कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.