सातारा : पाटण तालुक्यातील कोयनानगरपासून काही अंतरावर असणाऱ्या नवजा येथील धबधबा परिसरात साताऱ्यातील महिला पर्यटकांची तळीरामांनी छेडछाड केल्याची घटना घडली.कोयनानगरपासून ८ ते १० किलोमीटर अंतरावर नवजा हे गाव आहे. याठिकाणी पावसाळ्यामध्ये पडणारा धबधबा पाहण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे येथून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. रविवार, दि. १५ रोजी सातारा येथील २३ जणांचा एक ग्रुप चार वेगवेगळ्या वाहनातून सकाळी १० वाजता सातारा येथून नवजाकडे रवाना झाला.
तारळे, जळवमार्गे निसर्गाचा आनंद लुटत हा ग्रुप दुपारी १ वाजता नवजा येथे पोहोचला. वाहने पार्किंग करून धबधब्याच्या दिशेने चालत जात असताना रस्त्यावर ठिकठिकाणी तळीराम युवक दारू ढोसत रस्त्यावर उभे होते. काहीजण समूहाने दुचाकी वेगाने चालवत हॉर्न वाजवत जात होते. विशेष म्हणजे या परिसरात एकही पोलीस कर्मचारी तैनात नव्हता.
साताऱ्यांतील पर्यटक धबधब्याच्या दिशेने चालत जात असताना ग्रुपमधील महिलांना तळीराम युवकांनी धक्के मारने, जोरजोराने ओरडणे, पाठीमागून वेगाने पळत येत महिलांना भीती दाखवणे, मध्येच रस्त्यात येऊन उभे राहणे, असे प्रकार सुरू केले. त्यावर ग्रुपमधील युवकांनी संबंधित युवकांना जाब विचारल्यानंतर त्यांचे ओरडने थोडेफार कमी झाले.साताऱ्यातील महिला पर्यटक नवजा येथील प्रेक्षक गॅलरीत पोहोचल्या असता त्याठिकाणीही तळीराम युवकांनी त्यांचा रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. धबधबा पाहून पुन्हा खाली येताना तळीराम युवकांच्या मनस्तापाला त्यांना सामोरे जावे लागले.पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे तळीराम युवकांचे फावत असून महिलांची छेड काढण्याइतपत त्यांची मजल जात आहे.
रविवारी नवजा येथे आलेल्या या भयानक अनुभवाने साताऱ्यांतील महिला पर्यटकांनी पुन्हा नवजा येथे कधीही न जाण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसंबंधी पोलीस प्रशासनाने विविध उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही महिलांनी केली आहे.