सातारा : ‘शहराची हद्दवाढ, मेडिकल कॉलेज किंवा आयटी पार्क हे सर्व प्रश्न भाजप सरकारमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. शहराची विकासकामे रोखण्याचे काम या सरकारसह भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केले आहे,’ असा घणाघाती आरोप करीत ‘आगामी विधासभा निवडणुकीला गाफील न राहता ताकदीने सामोरे जाऊ या,’ असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.आगामी विनाधसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा येथील एका मंगल कार्यालयात शुक्रवारी रात्री आजी-माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अशोक मोने, नगरसेवक अविनाश कदम, अमोल मोहिते, बाळासाहेब खंदारे, जिल्हा परिषदेचे सदस्य जयवंत भोसले, प्रकाश गवळी, प्रकाश बडेकर, सुधीर धुमाळ यांच्यासह आजी-माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘अनेक कार्यकर्त्यांनी भाऊसाहेब महाराजांसोबत काम केलं आहे. त्यांच्याइतकेच प्रेम जनता माझ्यावरही करीत आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीला ताकदीने सामोरे जाण्याची गरज आहे. शहरात संपर्क वाढविण्यावर भर द्यायला हवा. केवळ विकासकामे करून चालणार नाही तर लोकांमध्ये मिसळायला हवे. लोकांच्या सुख-दु:खात सर्वांनी सहभागी व्हायला हवे. सर्वसामान्य जनतेबरोबरच महिलांच्या प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक करा. गेल्या निवडणुकीला आपण कोठे कमी पडलो, याचा विचार व्हावा.’जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बडेकर म्हणाले, ‘कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ही बैठक आहे. कोण किती पाण्यात, हे यापूर्वी आपल्याला कळले आहे. सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. जावळी तालुका अधिक प्रेम करणारा आहे. त्याप्रमाणे साताऱ्यानेही शिवेंद्रसिंहराजेंवर प्रेम करावे.’सुधीर धुमाळ म्हणाले, ‘बुथ आणि वॉर्डनिहाय काम करावे. लहान कार्यकर्त्यांचेही मत विचारात घ्यावे. विरोधकाला कमजोर समजू नका. नगरपालिकेत सहा नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे.’प्रकाश गवळी म्हणाले, ‘आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची दिशा आत्ताच ठरली पाहिजे. नेता खंबीर असेल तर कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण होतो. संभाषण कौशल्य आणि नवीन पद्धतींचा अभ्यास केला पाहिजे. लोकसभेला कोणाचा कोणाला पायपूस नव्हता,’ अशी नाराजी व्यक्त करत गवळी पुढे म्हणाले, ‘सक्षम आणिविश्वासू कार्यकर्ते निर्माण केले पाहिजेत.’‘शहरातील विविध भागांत बैठकांचे आयोजन करावे. सत्ताधारी आघाडीमुळे कामे होऊ शकली नाहीत, हे पटवून द्यावे. शहराबाहेर रोजगारासाठी गेलेल्या युवकांसोबत संपर्क वाढवावा,’ असे मत अशोक मोने यांनी व्यक्त केले.शहराचा विकास भाजपने रोखला‘सातारा शहरात मोठे उद्योगधंदे येत नाहीत, येथील एमआयडीसी विकसित होत नाही, तरुणांना रोजगार नाही, अशी ओरड नेहमीच होत आली आहे; परंतु सातारा एमआयडीसीसाठी आम्ही नेहमीच प्रयत्न केले आहेत. यासाठी देगाव येथील एक हजार एकर जागाही आरक्षित केली होती. देगाव, वर्णे व निगडी येथील शेतकरी एमआयडीसीला जागा द्यायला तयार नाहीत. त्यामुळे साताºयात मोठी एमआयडीसी विकसित होऊ शकली नाही. आयटी पार्कची हीच परिस्थिती आहे. मोठ-मोठ्या कंपन्यांना आयटी पार्कसाठी पुणे शहरच सोयीस्कर वाटते. साताºयातील मेडिकल कॉलेजची जागा हस्तांतरित करण्यासाठी या सरकारला तीन वर्षे लागली. आता यासाठी दोनशे ते तीनशे कोटींची तरतूद सरकार करेल की नाही, याची शंका आहे, असे मत यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. तर हद्दवाढ फायद्याची नसल्याने भाजप नेत्यांचाच याला विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गाफील न राहता ताकदीने लढा द्या; शिवेंद्रसिंहराजेंचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 11:37 PM