सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात उघडीप दिलेल्या पावसाचं दमदार पुनरामगन झाले असून, २४ तासांत नवजाला सर्वाधिक ११३ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणातही पाण्याची आवक वाढल्याने पाणीसाठा ८६ टीएमसीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.जिल्ह्यात बऱ्याच दिवसांच्या खंडानंतर पावसाला सुरुवात झालेली आहे. पूर्व दुष्काळी भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडू लागलाय. यामुळे पिकांना जीवदान मिळणार आहे. पण, रब्बी हंगाम चांगला घेता यावा यासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची गरज आहे. तर पश्चिमेकडेही चांगले पुनरामगन झाले आहे. कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात पावसाचा जोर आहे. यामुळे पुन्हा एकदा ओढे खळाळून वाहू लागलेत. भात खाचरात पाणी साठल्याने फायदा झाला आहे. त्यातच पश्चिम भागातच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, कण्हेर, उरमोडी अशी प्रमुख धरणे आहेत. या धरणांचीच पाणी साठवण क्षमता ही १४८ टीएमसी आहे. त्यामुळे ही धरणे भरणे महत्त्वाचे आहे. सध्या उरमोडी वगळता सर्वच धरणात ८० टक्क्यांच्यावर पाणीसाठा झालेला आहे. ही धरणे भरण्यासाठी सतत आणि दमदार पावसाची गरज आहे.पश्चिम भागातही तीन दिवसांपासून पावसाचे पुनरामगन झालेले आहे. धरणक्षेत्रातही पाऊस पडतोय. यामुळे धरणात हळूहळू पाणीसाठा वाढू लागला आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद नवजाला ११३ मिलिमीटरची झाली. तर कोयनानगर येथे ८३ आणि महाबळेश्वरला ९२ मिलिमीटर पाऊस पडलेला आहे.
एक जूनपासूनचा विचार करता कोयनेला ३६३७, महाबळेश्वरमध्ये ४८८६ आणि नवजाला सर्वाधिक ५२०१ पावसाची नोंद झालेली आहे. तर धरणक्षेत्रात पाऊस पडत असल्याने कोयनेत पाण्याची आवक वाढली आहे. सकाळच्या सुमारास ६७९४ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरण पाणीसाठा ८५.८१ टीएमसी झालेला. तरीही धरण भरण्यासाठी अजून १९ टीएमसी पाण्याची गरज आहे. धरणाच्या पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.
कोयनेला ३३५ मिलिमीटर पाऊस कमी...जिल्ह्यात दरवर्षी कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला सरासरी पाच हजार मिलिमीटर पाऊस पडत असतो. यंदा मात्र, पावसाचे प्रमाण कमी आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत कोयनेला ३३५, नवजाला २२ मिलिमीटर पाऊस कमी पडलेला आहे. तर महाबळेश्वरला ३० मिलिमीटर अधिक पाऊस पडलेला आहे.