संजय कदम ।वाठार स्टेशन : शरीराने धडधाकट असलेली माणसं आज कारणं सांगून कामांची टाळाटाळ करताना आपण पाहतो. मात्र, तळिये (ता. कोरगाव) येथील सुनीता गायकवाड नावानी दुर्गा अवघ्या एका हाताच्या सामर्थ्यावर जलक्रांती घडवायला निघाली आहे. या दुर्गेची ही स्फूर्ती पाहून अनेकांनी गावे पाणीदार करण्यासाठी हाती टिकाव अन् फावडे घेतले आहे.महाराष्ट्रात सोमवार, दि. ८ एप्रिलपासून ‘वॉटर कप’ स्पर्धेचं तुफान सुरू झालं. सातारा जिल्ह्यातील तब्बल १६३ गावे या स्पर्धेत सहभागी झाली आहेत. कोरेगाव तालुक्यातील तळिये ग्रामस्थांनीही गाव पाणीदार करण्यासाठी वज्रमूठ आवळली आहे. श्रमदानासाठी अख्खं गाव पुढे आलं असताना याच गावात राहणाऱ्या सुनीता सिद्धार्थ गायकवाड या रणरागिणीने सर्वांपुढे आदर्श निर्माण केला आहे.औषधांच्या अतिरिक्त सेवनामुळे काही वर्षांपूर्वी सुनीता गायकवाड यांना आपला एक हात गमवावा लागला. मात्र, त्यांनी या गोष्टीचं कधीच वाईट वाटून घेतलं नाही. त्यांचे पती सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी करतात. आॅपरेशनसाठी पैसे मिळू न शकल्याने त्यांना आपला पोटचा मुलगा गमवावा लागला. अशा कठीण प्रसंगातही त्या डगमगल्या नाही. मुलाची पत्नी व मुलगा या दोघांचा त्या मोलमजुरी करून सांभाळ करीत आहेत.आपल्या गावात काही करून पाणी खळाळलं पाहिजे, या जिद्दीने पेटून उठलेल्या सुनीता यांनी एक हात नसतानाही वॉटर कप स्पर्धेंतर्गतसुरू झालेल्या कामांमध्ये सहभाग घेतला आहे. अवघ्या एका हाताच्या सामर्थ्यावर त्या जलक्रांती घडवूपाहत आहेत. त्यांची ही जिद्द प्रेरणादायी ठरत आहे.मला दुष्काळ मान्य नायएक हात गमावूनही सुनीता गायकवाड या श्रमदानासाठी पुढे सरसावल्या आहेत. त्यांचे काम पाहून अनेकजण थक्क होत आहेत. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना त्या म्हणाल्या, ‘आमचं गाव दुष्काळाशी लढत आहे. दुष्काळ मला मान्य नाय. गावात पाणी यावं म्हणून मी इथं काम करायला आले आहे. पाण्यासाठी वाट्टंल ते करायची माझी तयारी हाय.’तळिये (ता. कोरेगाव) येथे ‘वॉटर कप’ स्पर्धेंतर्गत श्रमदानास सुरुवात झाली असून, एक हात गमावूनही स्पर्धेत श्रमदानासाठी उतरलेल्या सुनीता गायकवाड सर्वांना प्रेरणा देत आहेत.
एक हात गमावूनही तळियेच्या रणरागिणीची जलक्रांतीसाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:27 AM