शरद देवकुळे ल्ल पळशी मुला-मुलींचं लग्न जुळवणं किती अवघड असतं, हे न विचारलेलंच बरं. त्यातूनही मुलं अपंग असतील तर महाकठीण होऊन जातं. हेच अवघड कार्य सोपं करण्याचं काम माण तालुक्यातील मोही ग्रामस्थांनी केलं. पायानं पन्नास टक्क्यांहून जास्त अपंग असलेल्या तरुण-तरुणीला लग्नाच्या रेशीमगाठीत बांधले. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून काही वस्तू आंदण देऊन त्यांचा संसार उभारला. मोही येथील एका संस्थेत पुरंदर तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील माउली लक्ष्मण तारू हे काम करत आहेत. ते दोन्ही पायानं पन्नास टक्के अपंग आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती बेताचीच असल्यानं लग्नही जमत नव्हतं. माउली तारू यांचा बीड येथील शोभा मुंजमुळे यांच्यामुळे परळी तालुक्यातील दौंडवाडी येथील बाळूबाई तानबा गोडबोले यांच्याशी परिचय झाला. पण दोघांच्याही घरची परिस्थिती बिकट होती. त्यामुळे त्यांचा संसार उभारण्याची जबाबदारी कोण उचलणार, हा प्रश्न निर्माण झाला होता. माउली तारू यांनी ही समस्या माजी प्राचार्य विलास फडतरे व तानाजी बनसोडे यांच्याशी बोलले. त्यानुसार फडतरे व बनसोडे यांनी याबाबत ग्रामस्थांशी चर्चा सुरू केली. याला ग्रामस्थांनी साथ दिल्याने लोकवर्गणी जमली. दशरथ नेटके, जिजाबा जाधव, रामहरी चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकीतून मोठी आर्थिक मदत केली. मंडप, ध्वनिक्षेपक यंत्रणा, जेवणाचा खर्च धनाजी माळी यांनी उचलला तर वाजंत्रीचा खर्च अण्णा केंगार यांनी घेतला. नवरदेवाची वरात, घोडा यांचा खर्च उमाजी नाईक तरुण मंडळाने केला. तर विलास फडतरे यांनी स्वत:च्या दारात मंडप उभारून जेवणाचा खर्चासह लग्न लावून दिले. रामहरी चव्हाण, जिजाबा जाधव, दत्ता जाधव, दाजीराम देवकर, संभाजी नेटके, धनाजी बनसोडे, दीपक जाधव, विजय जाधव, विठ्ठल देवकर, तानाजी बनसोडे, कुंडलिक केंगार यांनी परिश्रम घेतले. यावेळी नवरदेवाचे पाडेगाव आश्रमशाळेतील मित्र उपस्थित होते. दुसऱ्यांदा वरबाप अन् वरमाई विलास फडतरे या दाम्पत्याने असाह्य अपंगाचा विवाह स्वत:च्या दारात लावून देण्याबरोबरच त्यांच्या राहण्याची सोयही स्वत:च्या वाड्यातील एका खोलीत केली. संपूर्ण गाव आदराने फडतरे दाम्पत्याला वरबाप-वरमाई म्हणून संबोधत आहे. मुलाच्या लग्नानंतर आज पुन्हा वरबाप झालो आहे. अशा समाज कार्यातून खूप मोठा आनंद मिळत आहे. यात माझ्या पत्नीची मोठी मदत झाली. - विलास फडतरे, माजी प्राचार्य घरची हालाखीची परिस्थिती अन् आलेले अपंगत्व, यामुळे लग्न होईल असे वाटत नव्हते; पण माजी प्राचार्य विलास फडतरे आणि ग्रामस्थांच्या पुढाकारामुळे हे शक्य झाले. मोही ग्रामस्थांनी दाखवून दिलेला समाजकार्याचा वसा कायम जपणार आहे. - माउली तारू, नवरदेव.
रेशीमगाठीत अडकून ‘ते’ बनले एकमेकांचे आधार!
By admin | Published: February 01, 2016 1:02 AM