कऱ्हाड : येथील शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तेराशे विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्राचा परीक्षा फॉर्म भरताना ‘लेट फी’ भरावी लागणार का, हा प्रश्न मंगळवारी अखेर निकालात निघाला. विद्यार्थ्यांना विद्यापिठ नियमाप्रमाणे मुदत देण्यात येणार असुन त्या मुदतीत फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क भरावे लागणार नसल्याचा निर्वाळा महाविद्यालय व्यवस्थापनाकडून देण्यात आला.कऱ्हाडच्या शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रथम सत्राची परीक्षा डिसेंबर २०१४ मध्ये पार पडली. परीक्षा पुर्ण झाल्यानंतर ४५ दिवसात निकाल जाहिर होणे विद्यार्थ्यांना अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. याबाबत महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी संपर्क साधला असता विद्यापिठाने निकाल राखून ठेवल्याचा व त्याबाबत विद्यापिठाशी संपर्क साधण्याचा सल्ला महाविद्यालय व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांना देण्यात आला. विद्यार्थ्यांनी विद्यापिठाशी संपर्क साधला असता तुमच्या महाविद्यालयातील प्राध्यापक पेपर तपासणीसाठी आले नसल्यामुळे निकाल राखून ठेवण्यात आल्याचे विद्यापिठाकडून सांगण्यात आले. या परीस्थितीमुळे विद्यार्थी कोंडीत सापडले. इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांचा निकाल १६ जानेवारीला जाहिर झाला असताना त्यानंतर दहा ते बारा दिवस होऊनही आपला निकाल जाहिर न झाल्याने विद्यार्थ्यांत चिंतेचे वातावरण होते. तेराशे विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाला ‘लोकमत’ने वाचा फोडली. या प्रकाराबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच कऱ्हाडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्वच शाखांचा निकाल ‘आॅनलाईन’ जाहिर करण्यात आला. मात्र, निकाल जाहिर झाला असला तरी विद्यार्थ्यांच्या पेपर पुनर्तपासणी व दुसऱ्या सत्राचा परीक्षा फॉर्म भरताना ‘लेट फी’ भरावी लागणार का, हे प्रश्न अनुत्तरीत होते. गत दोन दिवसांपासुन ‘लोकमत’कडून याचा पाठपुरावा केला जात होता. अखेर मंगळवारी याबाबत महाविद्यालय व्यवस्थापनाने तोंड उघडले. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापिठ नियमाप्रमाणे २७ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले. तसेच आवश्यकता वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर पुनर्तपासणीचा फॉर्म भरण्यासाठीची मुदत ७ फेब्रुवारीपर्यंत असल्याचेही व्यवस्थापनाने स्पष्ट केले. मुदतीत फॉर्म भरणाऱ्यांकडून विलंब शुल्क घेतले जाणार नसल्याचे सांगीतले जात असले तरी ही सर्व प्रक्रिया पार पडेपर्यंत विद्यार्थ्यांशी संपर्कात राहून त्यांचे प्रश्न तडीस नेणार असल्याची प्रतिक्रिया मंगेश सुरूसे याने दिली. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांचा ‘लेट फी’चा प्रश्नही निकालात
By admin | Published: February 03, 2015 11:22 PM