वडूज : येथील निर्भया पथकामुळे तसेच हुतात्मा परशुराम विद्यालय व छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या शिक्षकांच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीचे गुण दिसू लागले आहेत.
शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी होणारी धावपळ लक्षात घेता. याप्रसंगी छोटे- मोठे अपघात टाळण्यासाठी आणि अंगी शिस्त यावी, यासाठी निर्भया पथकाकडून मार्गदर्शन होत आहे. निर्भया पथकाचा हा उपक्रम आजअखेर तालुक्यातील इतर बसस्थानक व शाळांना दिशादर्शक ठरत आहे.
वडूज हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी एकूण सात ते आठ शाळा आहेत. वडूजसह परिसरातून पंधरा ते सोळा खेडेगावातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. जिल्हा प्रशासनाने मुली व महिलांच्या स्वसंरक्षणार्थ निर्भया पथके नेमली आहेत. वडूज बसस्थानकावर शाळा सुटल्यानंतर फार मोठी गर्दी होत असते. लहान मुलाचे तसेच वृद्ध लोकांचे बसमध्ये चढताना व उतरताना यापूर्वी हाल होत होते. या निर्भया पथकामुळे आणि शिक्षकांच्या समयसूचकतेमुळे या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास फार मोठे सहकार्य मिळत आहे. या सहकाºयामुळे मुलींना प्रवास करताना कोणतीही भिती वाटत नाही.
सध्या या उपक्रमांमुळे रोड रोमिओंना मोठी चपराक बसली आहे. तर महिला पोलिस आणि शिक्षक यांच्या मदतीने शाळा परिसरातील अवैध व्यावसायांना देखील चाप बसवावा,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.