सातारा : शाहूपुरी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंबेदरे येथील शेतावर जाऊन सोयाबीन काढणीच्या कामात प्रत्यक्ष सहभाग घेत शेती संस्कारांचा धडा घेतला. संस्थेच्या 'प्रत्यक्ष कृतीतून प्रयोगशील शिक्षण' या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे हे यश आहे.राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघ शाहूपुरी सातारा संचलित संस्थेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा भाग म्हणून दरवर्षी इयत्ता आठवीतील विद्यार्थी हे लगतच्या शेतशिवारात जाऊन पेरणीपूर्व मशागत, पेरणी आदी कामांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन गेली अनेक वर्षे अनुभव घेत असतात. याचाच एक भाग म्हणून यावर्षीही पावसाच्या तोंडावर याच शेतावर जाऊन विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या व शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीन पेरणीचा अनुभव घेतला होता.यावेळी त्यांनी सर्व प्रकारच्या बियाणांची, शेती अवजारांची, सेंद्रिय खते, शेतीपूरक व्यवसाय,ग्रामीण राहणीमान व दैनंदिन जीवन आदींची माहिती घेतली होती.विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच कृषीप्रधान संस्कृतीचेही ज्ञान तेवढेच महत्त्वाचे असून यासाठीच संस्थेच्या माध्यमातून हा महत्वाकांक्षी प्रकल्प गेले अनेक वर्षे राबविण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष भारत भोसले यांनी दिली. या प्रकल्पासाठी समन्वयक म्हणून एम. आर. जाधव, एन. ए. कांबळे व पी. एस. निंबाळकर काम पहात आहेत.
पिक काढणीच्या कामात विद्यार्थी व्यस्त, प्रत्यक्ष कृतीतून प्रयोगशील शिक्षणाचा प्रयोग
By प्रगती पाटील | Published: October 17, 2023 1:37 PM