सणबूर : ढेबेवाडी विभागातील डोंगराळ भागातील गावोगावी आणि वाड्या-वस्त्यांवर प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे; मात्र अजूनही माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणाचे जाळे विणले गेलेले दिसत नाही. शिक्षणासाठी वाहतूक साधनांचा अभाव व अपुऱ्या शिक्षणाच्या सुविधांमुळे या विभागातील अनेक गावांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागत आहे.उन्हाळा, पावसाळा असो की हिवाळा दररोज पाच-दहा किलोमीटर अंतर पार करून त्यांना शिक्षणासाठी जावे लागत आहे. ढेबेवाडी विभागातील दुर्गम डोंगराळ भागात स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक वर्षे मूलभूत सुविधांची कमतरता कायम राहिली. भौगोलिक अडचणींमुळे अनेक वर्षे तेथील जनतेच्या नशिबी वनवास आला. आता कुठे डोंगरवासीयांच्या गावी विकासाचे झुंजुमुंजू होऊ लागले आहे. रस्त्याबरोबरच विविध सुविधाही पोहोचू लागल्या; मात्र शिक्षणाच्या परिपूर्ण सुविधा पोहोचायला अजून किती पिढ्या जातात हे सांगणे तूर्तास कठीण आहे.
प्राथमिक शिक्षणाची सुविधा गावोगावी वाडी-वस्त्यांवर पोहोचल्या असल्या तरी माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणाची सोय अजूनही नाहीच डोंगराळ भागात गावे आणि वाड्यावर त्या विखरून आहेत. शिवाय माध्यमिक विद्यालयाची सोय नसल्याने अनेक विद्यार्थ्यांसमोर पायपीट करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.विभागातील कसणी, वरचे घोटील, निगडे, मोडकवाडी, निवी, मत्रेवाडी, पाळशी, पानेरी, सातर वर्पेवाडी, पानेरी, माईंगडेवाडी आदी गावातील विद्यार्थ्यांना दररोज पायपीट करून माध्यमिक विद्यालयांमध्ये शिक्षणासाठी यावे लागते तसेच सपाटीच्या काही गावांतील विद्यार्थ्यांचीही स्थिती त्यापेक्षा काही वेगळी नाही बऱ्याच गावात एसटी, वाहनांची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना चालतच प्रवास करावा लागतोय. काहींच्या नशिबी एक-दोन किलोमीटर तर काहींच्या नशिबी दहा ते पंधरा किलोमीटरची पायपीट कायमच आहे. काही गावांच्या शाळांकडे जाण्याचा मार्ग ओढ्याने नद्यातून जात असल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत जाणेही कठीण होत आहे.
मोफत पास, मात्र एसटीच नाही..
राज्य शासनाच्या वतीने शिक्षण विभागासाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. त्यापैकी अहिल्यादेवी होळकर योजनेद्वारे प्राथमिक शिक्षणातील पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी एसटीची मोफत प्रवास सुविधा केलेली आहे. या सुविधांच्या फायदा अजून ग्रामीण भागातील मुलींकडून मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे; मात्र पाटण तालुक्यातील अजूनही काही दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवर मुलींना याचा फायदा घेता आलेला नाही.ढेबेबाडी विभागातील अनेक दुर्गम गावातील ग्रामस्थ व विद्यार्थिनी अजूनही एसटीचे तोंडही पाहिलेले नाही. त्यामुळे या विभागातील अनेक मुली या शासनाच्या अहिल्यादेवी होळकर योजनेच्या सुविधांपासून आजही वंचित आहेत. त्यांच्या नशिबी आजही शिक्षणासाठी पायपीट कायम आहे.