वाई : ‘शेतीक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लोक इतर क्षेत्राकडे वाळू लागले आहेत. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता व्यावसायिक शेती करावी. त्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी किफायतशीर तंत्रज्ञान विकसित करावे,’ असे मत प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर यांनी व्यक्त केले.
कोलन, पसरणी, ता. वाई येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक जोड कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालय फलटण येथे शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी अश्विनी पोटकुले हिने घरच्याघरी योग्य बोर्डो मिश्रण बनवणे आणि ओळखण्याची पद्धत
व फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी यासंदर्भात प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी तिने शेतातील तण नियंत्रणाच्या वेगवेगळ्या पद्धतींची माहिती प्रात्यक्षिकांसह करून दाखवली. चारा प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविले.
कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. पी. गायकवाड, प्रा. ए. एस. नगरे, प्रा. एस. वाय. लालगे, प्रा. एन. एस. धालपे, प्रा. पी. व्ही. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमांची माहिती देण्यात आली. यावेळी शाळा कृती समितीचे अध्यक्ष विजय येवले, प्रवीण भांडवलकर, नामदेव पोटकुले, प्रगतिशील शेतकरी सचिन पवार, साहेबराव पवार, देवराम येवले, हिरा पोटकुले, सुयश पोटकुले, कुंदा पवार, दीपाली पवार, वैष्णवी पवार, गणेश लोहकरे, सानवी पवार उपस्थित होते.