रशिद शेख औंध : सातारा, वडूज, कोरेगाव या डेपोंकडून औंधला सातत्याने अन्यायकारक व सापत्नपणाची वागणूक मिळत आहे. औंध हे धार्मिक, ऐतिहासिक, संस्थानचा वारसा लाभलेली नगरी असून सुद्धा शाळा सुरु झाल्यानंतर दरवर्षी एसटीची बोंबाबोंब असते, या सर्व बाबींना कंटाळून काल, सोमवारी रात्री एसटीची वाट बघून विद्यार्थ्यांचा संयम सुटला व 'आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे! आमची एस टी सुरु झालीच पाहिजे' असा पवित्रा घेत रात्री दहा वाजेपर्यंत बसस्थानकात ठिय्या आंदोलन करून घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सातारा ते कान्हरवाडी ही एसटी औंध येथे वेळेत न आल्याने शाळकरी मुली व मुलांनी भरपावसात रात्री सुमारे तीन तास औंध बसस्थानकात ठिय्या आंदोलन करून घोषणांनी परिसर दणाणून सोडला. टेंम्पो नको, सहानुभूती नको, आम्हाला वेळेत एसटी गाडी मिळालीच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देऊन एसटी प्रशासनासह ,शासकीय प्रशासन यंत्रणा हलवून सोडली. विद्यार्थ्यांचे रौद्ररूप पाहून औंध बसस्थानकात शेकडो, ग्रामस्थ, युवकांनी गर्दी केली होती.विद्यार्थ्यांची समजूत काढण्यासाठी शिक्षकांनी लगेचच टेम्पोची व्यवस्था केली होती, मात्र लांडेवाडी, त्रिमली, वडी, कळंबी येथील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करीत वाट पाहीन पण एसटी नेच जाईन असा आक्रमक पवित्रा घेतला. शिक्षक, पालक, ग्रामस्थ यांनीही कोरेगाव आगार व एसटी महामंडळाच्या मनमानी कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.दरम्यान रात्री उशीरा सातारा विभाग नियंत्रक ,कोरेगाव आगार वडूज आगाराच्या अधिकारी वर्गाने ठोस आश्वासन दिल्यानंतर तसेच औंधचे उपसरपंच दिपक नलवडे, सहसचिव प्रा.संजय निकम, प्राचार्य एस.बी.घाडगे, उपप्राचार्य प्रा.प्रदिप गोडसे, ग्रामस्थ, शिक्षकांनी मध्यस्थी केल्यानंतर विद्यार्थी एसटी मधून कळंबी गावी जाण्यास तयार झाले.
आमची एस.टी सुरु झालीच पाहिजे!, भरपावसात विद्यार्थ्यांचा औंध बसस्थानकात ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 4:27 PM