लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शासनाच्या सूचनेनुसार पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे तीन तास शाळा घेण्यात येत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळेत पोषण आहार शिजवण्यास बंदी आहे. त्यामुळे मुलांना भूक लागूनही उपाशीच राहावे लागत आहे. काही शिक्षक मात्र डबे आणतात तर शहरातील काही शिक्षक हॉटेलमध्ये जावून खात आहेत.
प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे आहे. मात्र, घरापासून शाळा लांब असल्याने शाळेच्या वेळेपेक्षा आधी मुलांना घराबाहेर पडावे लागते. साहजिकच शाळा सुटल्यानंतर घरी पोहोचण्यास विलंब होत असल्यामुळे मुलांना भूक लागत आहे. पोषण आहार शिजवण्यास बंदी असल्यामुळे पालकांना शाळेत बोलावून तांदूळ, डाळी, कडधान्याचे वाटप करण्यात येत आहे. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक मुलासाठी धान्य, तांदूळ दिले जात आहेत. परंतु, शाळेत उपलब्ध होणारा गरमागरम डाळभात असो वा खिचडी तूर्तास मिळत नसल्याने मुलं भुकेने व्याकूळ होत आहेत.
घरातून शाळेसाठी निघताना चपाती-भाजी किंवा चहा-बिस्कीट खाऊन काही मुले बाहेर पडतात. परंतु, घरापासून शाळा लांब असल्याने येण्या-जाण्यासाठी अधिक वेळ लागतो. भर उन्हातून घरी गेल्यानंतर मुलांना जेवणच जात नसल्याचे पालक सांगत आहेत. काही पालकांनी तर धान्य, तांदूळ वाटप करण्यापेक्षा शाळेतच पोषण आहार शिजवून मुलांना वाढावा, अशी मागणी केली आहे.
काही शाळा घड्याळी तीन तास अध्यापन करत असल्या, तरी काही शाळांमध्ये विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यात येत असल्याने मुलांना शाळा संपल्यानंतर जादा वेळ शाळेत थांबावे लागते. परिणामी जास्त वेळ थांबावे लागत असल्याने काही जागरुक पालक मुलांना खाऊचा डबा सोबत देत आहेत. त्यामुळे हात धुवून फावल्या वेळेत मुले डबा खात आहेत. मात्र, त्यामुळे केवळ भूकेचे क्षमन होत आहे. पोषण आहार दिला जात नसल्याने मुलांना पाण्याच्या बाटलीबरोबर किमान डबा आणण्यास तरी परवानगी द्यावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.
कोरोनापूर्वी आम्ही डबा दिला तरी मुलांना शाळेतील खिचडी, डाळ-भात आवडायचा. परंतु, आता पोषण आहार शिजवण्याऐवजी तांदूळ, डाळीचे वाटप केले जाते. शाळा तीन तासांची असली तरी येण्या-जाण्यासाठी वेळ जास्त लागतो, त्यामुळे पोषण आहार गरजेचा आहे.
- अश्विनी जाधव, पालक
माझी मुलगी सातवीला आहे. सकाळी १०.३०ची शाळा असल्याने घरातून दहा वाजता बाहेर पडते. दुपारी २ वाजता शाळा सुटत असली तरी घरी येईपर्यंत अडीच वाजतात. घरातून बाहेर पडताना चपाती-भाजी खावून बाहेर पडत असली तरी येईपर्यंत भूक लागते. ऊन्हातून घरी आल्यानंतर पाणी गटागटा पिते. मुलं थकत असून, त्यांना भूक लागत नाही. त्यामुळे पोषण आहार शाळेतच शिजवून द्यावा.
- रूक्सार बागवान, पालक