लोकमत न्यूज नेटवर्ककुसूर : बारावीत नापास होण्याच्या भीतीमुळे विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कोळे (ता. कऱ्हाड) येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली. प्रतीक्षा उत्तम काकडे (वय १८) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळे येथील प्रतीक्षा काकडे ही युवती कऱ्हाडातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. नुकतीच तिने बारावीची परीक्षा दिली आहे. येत्या काही दिवसांत परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र, परीक्षेतील काही पेपर अवघड गेल्याने प्रतीक्षा तणावाखाली होती. गत काही दिवसांपासून ती नैराश्यात असल्याचे कुटुंबीयांना जाणवले होते. त्याबाबत त्यांनी तिची विचारपूस करून समजूतही घातली होती. मात्र, तरीही ती तणावात असल्याचे दिसून येत होते. प्रतीक्षाचे वडील शेतकरी आहेत. सोमवारी दुपारी वडील काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी प्रतीक्षाने राहत्या घरातच दोरीने गळफास घेतला. काही वेळानंतर वडील परत घरी आले असता दरवाजाला आतून कडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रतीक्षा झोपली असावी, असा त्यांचा समज झाला. त्यांनी तिला हाका मारल्या. मात्र, आतून कसलाच प्रतिसाद आला नाही. संशय आल्यामुळे वडिलांनी परिसरातील युवकांना बोलावून घराचा दरवाजा तोडला. आत जाऊन पाहिले असता प्रतीक्षाने गळफास घेतल्याचे त्यांना दिसून आले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह हवालदार बी. एच. जगदाळे व संजय राक्षे त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. बारावीत नापास होण्याच्या भीतीनेच प्रतीक्षाने आत्महत्या केली असावी, असा संशय कुटुंबीयांनी पोलिसांसमोर व्यक्त केला आहे. याबाबतची नोंद कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे. हवालदार आर. एस. पानवळ तपास करीत आहे
नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या
By admin | Published: May 22, 2017 11:10 PM