पाचगणी : राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत मेढा ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या व्यसनमुक्ती अभियानात जावळी तालुक्यातील भोगवली येथील प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे चित्र रेखाटून त्यातून आरोग्यावर होणाऱ्या व्याधींचे वास्तव मांडले. त्या चिमुकल्यांचा आरोग्य विभागातर्फे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यामध्ये अनुक्रमे श्रावणी अशोक गोळे, गायत्री अश्विन गोळे, अनुष्का मनोज सणस आणि सर्वेशा आश्विन गोळे व श्लोक वैभव गोळे यांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देण्यात आली.
भोगवली, प्राथमिक शाळेत राष्ट्रीय आरोग्य मोहिमेंतर्गत ग्रामीण मेढा यांच्यावतीने तंबाखूमुक्त अभियानानुसार चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये शाळेतील पंधरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक विद्यार्थ्याने व्यसनाधीनतेवर चित्रकलेच्या माध्यमातून आरोग्यावर होणारा परिणाम रेखाटला होता. या सर्व चित्रांतून परीक्षकांनी तीन क्रमांक काढले. त्यामध्ये तीन विद्यार्थ्यांचे क्रमांक काढले. त्यांना मेढा ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र माने, समुपदेशक प्रियांका कदम यांनी प्रमाणपत्रे प्रदान केली.
यावेळी मुख्याध्यापक सुरेश पार्टे, धीरज गोळे, भाऊसाहेब दानवले, आरोग्य कर्मचारी अशोक गोळे, अभिजित महामुलकर, ग्रामस्थ बंटी गोळे उपस्थित होते. सरपंच अश्विन गोळे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.