लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहरातील राजपथावर रात्रीच्या सुमारास युवकांकडून दुचाकीवरून स्टंटबाजी सुरू असते. यामुळे अपघात होत आहेत. पोलिसांनी अशा हुल्लडबाजांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
राजपथावर रात्री नऊनंतर काही युवक दुचाकी बेफामपणे चालवतात, तसेच हॉर्नचाही कर्णकर्कश आवाज करतात. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे, तसेच अपघातही घडत आहेत. अशा हुल्लडबाज युवकांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. रात्री साडेदहापर्यंत काही ठिकाणी तरी पोलिसांची नियुक्ती करावी, म्हणजे संबंधितांवर कारवाई करता येईल, अशी मागणी होत आहे.
................................................
शेकोट्याभोवती राजकीय गप्पांना ऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
दहीवडी : माण तालुक्यात थंडी पुन्हा वाढू लागली असून, गावोगावी शेकोट्या पेटत आहेत. या शेकोट्यांभोवती राजकीय गप्पा रंगत आहेत.
माण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक सुरू आहे. जवळपास ५० ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. त्यातच थंडी वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिक रात्रीच्या सुमारास स्वेटर घालून व कानटोपी, मफलर बांधून थंडीपासून स्वत:चे संरक्षण करीत आहेत, तसेच शेकोटीभोवती ग्रामपंचायत निवडणुकीच्या गप्पांचा फडही रंगत आहे.
.................................................
थंडीचा गहू
पिकाला फायदा
लोकमत न्यूज नेटवर्क
वरकुटे मलवडी : माण तालुक्यात सध्या थंडी वाढू लागली आहे. या थंडीचा गहू पिकाला फायदा होईल, असे सांगितले जात आहे.
माण तालुक्यात रबी हंगामामध्ये सर्वाधिक ज्वारीचे पीक घेण्यात येते, तर गहू, हरभरा अशी पिकेही घेण्यात येतात. सध्या गहू पीक चांगल्या स्थितीत आले आहे. शेतकऱ्यांनी पिकाला पाणी देणे सुरू केले आहे. त्यातच थंडी वाढत असल्याने गहू पिकाला फायदा होईल.
.....................................
महाबळेश्वरवाडीमधील
बंधाऱ्यात पाणीसाठा
लोकमत न्यूज नेटवर्क
वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील महाबळेश्वरवाडी परिसरातील बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे रबी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे. गेल्या वर्षी महाबळेश्वरवाडी परिसरात सतत पाऊस सुरू होता. सततच्या पावसामुळे गावातून जाणारे ओढ्यावरील सर्वच बंधारे भरले आहेत. या बंधाऱ्यातील पाण्यावर पिके अवलंबून असतात. पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने पिकांना फायदा होणार आहे.
................................................
ऊसतोडणीला वेग
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसेगाव : साताऱ्यासह बाहेरील जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन दोन महिने झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांत सध्या वेगाने ऊसतोड सुरू असल्याचे दिसत आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होतो. सद्य:स्थितीत अनेक कारखाने अजूनही सुरू आहेत. त्यामुळे अनेक गावांत ऊसतोड मजुरांच्या खोपी दिसू लागल्या आहेत, तसेच शिवारात मजूर उसाची तोडणी करीत आहेत. ऊसतोडणीला वेग आल्याचे दिसून येत आहे.
....................................................