सातारा: साताऱ्याचे माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांच्यावर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून उदयनराजेंच्या कॅालर उडवण्यावरुन टीका केली होती. उजयनराजेंना शिस्त लागाली असून भाजपात त्यांना कॅालर उडवणे जमत नसल्याचे शिवसेनेने म्हणटले होते. त्यावर आता उदयनराजेंनी शिवसेनेच्या त्या टीकेवर आपले मत व्यक्त करत शिवसेनेला टोला लगावला आहे.
शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केलेल्या टीकेवर उदयनराजे म्हणाले की, मी कधीच बेशिस्त नव्हतो. तसेच प्रत्येकाचा स्वाभाव एकसारखा नसल्याने कोणाला काय विचार करायचाय करु शकतात. प्रत्येकाला मत मांडण्याचे स्वातंत्र्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे कॅालर उडवण्यावर स्टाईल इज स्टाईल असं म्हणत उदयनराजेंनी शिवसेने केलेल्या टीकेवर पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उदयनराजेंच्या कॉलर उडविण्याचं समर्थन करत म्हणाले की, उदयनराजे हे मुक्त विद्यापीठ आहेत. कॉलर उडवणे हे त्यांची स्टाईल आहे. त्यांना जिथं वाटतं तिथं ते कॉलर उडवतात. त्यांच्यासारखं प्रत्येकाला जमत नाही. ते व्यासपीठावर असले की तसं करत नाहीत. ते जनतेमध्ये, तरुणांमध्ये असल्यानंतरच तसं करतात. कारण, त्यांची ही स्टाईल तरुणाईला आवडते. मला कॉलर उडवणं जमतं का, अन् ते जमणारही नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशानंतर सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली होती. तसेच अनेकांनी भाजपाला उदयनराजे आणि उदयनराजेंना भाजपा झेपणार नाही, अशा शब्दात या प्रवेशाचं विश्लेषण केलं. तर, विधानसभा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनीही राज्याचे छत्रपती किती दिवस भाजपात राहतात हेच पाहायचंय, असे म्हणत त्यांच्या भाजपा प्रवेशावर टीका केली होती.