सातारा : संशोधनासह तंत्रशिक्षणातील अद्यावत शिक्षण घेण्यासाठी जिल्हा बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा लोंढा कमी होणार आहे. जिल्ह्याच्या मातीला आवश्यक असणारे मनुष्यबळ तयार करण्यासाठी नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या विद्यापीठवारी वाचविण्याचे महत्वपूर्ण काम साताऱ्यात सुरू होणारे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र करणार आहे.शिवाजी विद्यापीठ अंतर्गत ७०० हून अधिक महाविद्यालय येत असल्यामुळे त्याचा गुणवत्तेवर परिणाम होऊ लागला आहे. २०१६ च्या कायद्यानुसार जिल्हावार उपकेंद्र सुरू करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्याचाच भाग म्हणून साताऱ्यात शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यासाठी सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. उपकेंद्रासाठी व्यवस्थापन परिषदेने प्राचार्य अर. व्ही. शेजवळ यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. जगदीश सपकाळे, डॉ. वर्षा मैंदर्गी, अमित कुलकर्णी, अमित जाधव, सारंग कोल्हापुरे, रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांची निवड केली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या सातारा उपकेंद्रासाठी समिती जागा बघणे, अभ्यासक्रम व मनुष्यबळ यांचे धोरण ठरवणे याचा अहवाल तयार करून देणार आहे. यानंतर विद्यापीठ प्रशासन या अहवालानुसार उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवणार आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, सेवक वर्ग आणि संस्थाचालक यांना विविध प्रशासकीय कामे व गुणपत्रके, फेर मूल्यांकन, पदवी प्रमाणपत्र, मायग्रेशन आदी कामांसाठी वारंवार कोल्हापूरला जावे लागते. जिल्ह्यात हे उपकेंद्र सुरू झाल्यास अनेकांची गैरसोय टळणार आहे.
मातीच्या गरजेनुसार अभ्यासक्रमसाताऱ्यातील औद्योगिक वसाहती बरोबरच कृषी क्षेत्राशी निगडित शिक्षण घेतल्यास स्थानिकांना रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची वेळ येणार नाही त्यामुळे काही उद्योजकांसह जिल्ह्यातील मान्यवरांची सल्लामसलत करून उपकेंद्रात कोणते अभ्यासक्रम घ्यावेत याविषयी समिती चाचणी करणार आहे.
परदेशी शिक्षण चक्क साताऱ्यात!जगभरातील नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठे ऑनलाईनच्या माध्यमातून महानगरांमध्ये पोहोचली आहेत. त्यांच्याबरोबर सामंजस्य करार करून गावाखेड्यातील विद्यार्थ्यालाही आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण कसे मिळवता येईल यासाठी शिवाजी विद्यापीठाचे हे उपकेंद्र प्रयत्नशील राहणार आहे.
शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र साताऱ्यात सुरू झाल्यामुळे शिवाजी विद्यापीठावरील प्रशासकीय ताण कमी होणार आहे. स्थानिक गरजेनुसार आवश्यक असलेले अभ्यासक्रम या उपकेंद्रात राबविता येणार आहेत. शिक्षणासाठी जिल्हा बाहेर जाण्यापेक्षा महत्त्वपूर्ण शिक्षण साताऱ्यातच मिळेल यासाठी उपकेंद्र प्रयत्नशील राहणार आहे. - डॉ. राजेंद्र शेजवळ, अध्यक्ष, उपकेंद्र व्यवस्थापन परिषद