सांगली : यंदा झालेले विक्रमी साखर उत्पादन व त्याप्रमाणात देशांतर्गत बाजारात मागणी कमी असल्याने साखर उद्योगासमोरील अडचणी वाढल्या आहेत. अपेक्षेपेक्षा वाढलेल्या अतिरिक्त साठ्यामुळे साखर दराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठीच राज्याच्या कोट्यातील ६ लाख २१ हजार टन साखर निर्यात करण्यास परवानगी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. तसेच साखर उद्योगासमोरील अडचणी सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन सहकारमंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत केले.
पालकमंत्री देशमुख म्हणाले की, निर्धारित वेळेपेक्षा दोन महिने अगोदर साखर कारखान्यांना गाळपास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे यंदा उत्पादन जास्त आणि मागणी कमी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागणी कमी असल्याने साखरेचे दरही उतरले आहेत. यावर उपाय म्हणून निर्यातीस प्राधान्य देणे आवश्यक आहे. राज्यातून किमान ६ लाख २१ हजार टन साखर अन्य देशात निर्यातीस परवानगी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे पंतप्रधान मोदी यांना भेटणार आहेत. साखर निर्यात झाल्यास प्रतिटन ५५ रुपयांप्रमाणे कारखान्यांना अनुदान देण्यास अडचणी नाहीत. मात्र, याचा ऊस उत्पादकांनाही लाभ देण्याबाबत बंधन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.‘लोकमंगल’प्रकरणी चौकशीस तयारपालकमंत्री देशमुख यांच्या ‘लोकमंगल’ साखर कारखान्यावर ‘सेबी’ने केलेल्या कारवाईबाबत ते म्हणाले की, लोकमंगल कारखानाही कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार आहे. कारखाना काढत असताना आम्हाला सेबीचे नियम माहिती नव्हते. त्यामुळे राज्यभर शेअर्स गोळा केले. आता पूर्वीच्या धोरणांनुसार कारवाई सुरू आहे. त्यामुळे आम्हीही चौकशीस सामोरे जाण्यास तयार असून सभासदांना त्यांच्या शेअर्सचे पैसे परत पाहिजे असतील तर ते देणार आहे.