सातारा : सातारा नगरपालिकेची सभा गुरुवारी भलतीच गाजली. कविता अन् चारोळी लिहलेल्या साहित्यामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं गेलं. एकीकडं करवाढीच्या विरोधात नगर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी सभात्याग केला, तर दुसरीकडे भाजपच्या नगरसेवकांनी पस्तीस लाखांच्या प्राणायम हॉलवर हल्लाबोल चढवला.
सातारा नगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी सकाळी सर्वसाधारण सभा सुरू झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माधवी कदम होत्या. या सभेत करवाढीचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला. 'पूर्वीच्या बजेटच्या सभेत आम्ही या बेकायदेशीर करवाढीला कडाडून विरोध केला होता, तरीही ही बेकायदेशीर करवाढ कोणतीही परवानगी नसताना तुम्ही परस्पर सातारकरांवर कशी काय कशी काय लादू शकता ?', असा सवाल नगरविकास आघाडीच्या अशोक मोने यांच्यासह इतर काही नगरसेवकांनी विचारला. पाणीपट्टी करात वाढ याबरोबरच स्वच्छता कर आणि अग्निशमन कर असे एकूण तीन विषय या सभेत मोठ्या गोंधळात चर्चिले गेले. विशेष म्हणजे प्रत्येक सभेत काहीतरी वेगळं करून सर्वांचं लक्ष वेधून घेणारे विनोद उर्फ बाळासाहेब खंदारे हे आज जणू साहित्यिक बोलून आले होते. 'विषय आहे खोल खोल.. बजेटचा आवाज वाजेना ढोल ढोल' ही आगळी वेगळी कविता लिहिलेला फ्लेक्स त्यांनी सभागृहात आणला होता. तसेच ,'गोरे नाहीत.. गोडबोले आहेत,' हे मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या बाबतीत लिहिलेले कापडही त्यांनी आपल्या शरीराभोवती गुंडाळले होते. तसेच शहरातील रस्त्यांवर रोज बंद चालू होणारा एलईडी बल्ब दाखवण्यासाठी चक्क बॅटरीला लावलेला एक एलईडी स्ट्रीट लाईट सभागृहात आणला होता. शेवटी सत्ताधारी शहर विकास आघाडीच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत नगर विकास आघाडीचे सर्व सदस्य सभात्याग करून बाहेर पडले. त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. सभापती वसंत लेवे यांच्या वॉर्डात पस्तीस लाख रुपये खर्चून मेडिटेशन हॉल अर्थात प्राणायम इमारत बांधली जात असल्याबद्दल प्रचंड गोंधळ निर्माण झाला. 'एकीकडे सध्या अस्तित्वात असलेली आहे ती मालमत्ता व्यवस्थित सांभाळता येत नाही, तेव्हा पालिकेने हा नवा उद्योग का करावा ?' असा सवाल यावेळी करण्यात आला.