सातारा : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पशुसंवर्धन विभागाने वाटप केलेल्या कोंबड्यांच्या विषयाने रंगत आणली. तसेच सदस्यांत हमरीतुमरीही झाल्याचे पाहावयास मिळाले. त्याचबरोबर सभेत शिरवळला उपजिल्हा रुग्णालय करण्याचा ठरावही घेण्यात आला.
सभेत सदस्य दीपक पवार यांनी कोंबडीवाटपाचा विषय उपस्थित केला. कोणाला जादा कोंबड्या दिल्या का सांगा? नाहीतर मी सातारा तालुक्यातील लाभार्थ्यांच्या घरी जाऊन कोंबड्या आहेत का ते तपासणार आहे. यावर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी कोणालाही जादा वाटप केले नसल्याचे सांगितले. पण, पवार यांनी लाभार्थी यादी द्या. मी दोन-तीन बॉडीगार्ड बरोबर घेऊन तपासणीला जाणारच, असे पुन्हा स्पष्ट केले. यामुळे सर्वत्र हशाच पिकला. यावर सभापती मंगेश धुमाळ यांनी कोंबडी वाटपात अधिकाऱ्यांनी कायदा व नियम तोडून काम केले नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.
सदस्य निवास थोरात यांनी कोपर्डे हवेली प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय उपस्थित केला. केंद्राला योग्य जागा सूचित करून मंजुरीला पाठवावी, असे स्पष्ट केले. यावर सदस्य शिवाजी सर्वगोड यांनी पुढील विषय घ्या असे म्हटले. यावरून थोरात यांनी असं पाठीमागून बोलायचं नाही, अध्यक्ष उत्तर देतील, असे सांगितले. तर सदस्य अरुण गोरे यांनीही मागून बोलायचे काम नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे काही क्षण तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, सभेत विविध ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता देण्यात यावे, असा ठरावही झाला. तसेच शिरवळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या ठिकाणी ओपीडी अधिक आहे. तसेच परिसरातील लोकसंख्या वाढलेली असल्याने शिरवळला उपजिल्हा रुग्णालय करण्यात यावे, अशी मागणी खंडाळ्याचे सभापती राजेंद्र तांबे यांनी केली. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचा ठराव घेण्यात आला.