लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी सर्वच यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवत सज्ज रहावे. पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता असते अशा ठिकाणची पहाणी करावी तसेच जिल्ह्यातील धोकादायक पुलांची पाहणी करून याचा अहवाल तातडीने सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.नैसर्गिक आपत्ती बाबत मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडली. या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी देविदास ताम्हाणे आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी श्वेता सिंघल पुढे म्हणाल्या, संबंधित सर्व यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनेचा आराखडा तयार करुन सर्वप्रथम आपले नियंत्रण कक्ष स्थापन करावेत. ग्रामीण भागातील गावांमध्ये पूर परिस्थतीचा मुकाबला करण्यासाठी गावातील युवकांना प्रशिक्षण द्यावे. यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी लक्ष घालावे. गावात चांगल्या प्रकारे पोहता येणाऱ्यांची नावे व दूरध्वनी क्रमांक संकलीत करुन गावातील भिंतींवर रंगवून घ्यावे व प्रदर्शीत करावेत अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील धोकादायक पुलांची पाहणी करुन उपाययोजना कराव्यात. यांत्रिकी विभागाने जिल्ह्यातील जेसीबी मशिनरीची माहिती तहसीलदारांना द्यावी. नदीपात्रातील अतिक्रमणाबाबत कारवाई करावी. गट विकास अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रत्येक गावात कार्यशाळा घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.या बैठकीस प्रांताधिकारी स्वाती देशमुख-पाटील, हिम्मत खराडे, सर्व तहसीलदार, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.पोलिसांसाठी प्रशिक्षण पोलिस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील ज्या पुलांवरुन पाणी वाहते अशा पुलांवरुन वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात येईल. यासाठी बॅरीकेट्चा वापर करण्यात येईल. आपत्तीच्या काळात ग्राम सुरक्षा दल, स्वयंसेवी संस्था यांची मदत घेण्यात येईल. निवडक पोलिसांनाही आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच अग्नीशमन दल दक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.
धोकादायक पुलांचा अहवाल तातडीने सादर करा
By admin | Published: May 24, 2017 11:11 PM