जिंती : फलटण येथील आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गाच्या सुरू असलेल्या कामात आर. के. चव्हाण इन्फा प्रा. लि., पुणे कडून शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडवून परवानगी न घेता गौणखनिज वाहतूक करणाऱ्या १५ ब्रास माती व मुरूम वाहणाऱ्या ४ वाहनांवर महसूल विभागाने कार्यवाही केली आहे.याबाबत महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार व सामाजिक कार्यकर्ते अमोल मोरे यांच्या तक्रारीवरून महसूल विभागाने फलटण-आसू रोड आसू पाटी धुळदेवजवळ विनापरवाना माती व मुरूम वाहणारे १५ ते २० वाहने जात असताना, त्यातील ४ गाड्या महसूल विभागाने पकडल्या असून, वाहनचालकाकडे गौण खनिज वाहतूक परवाना आल्याबाबत विचारणा केली असता, तो आढळून न आल्याने संबंधित ४ गाड्या धुळदेव तलाठी अभिजित मोरे, धुळदेव पोलिसपाटील पवन आडके यांनी ताब्यात घेऊन तहसील कार्यालय, फलटण येथे आणून जमा केल्या. संबंधित वाहनाचा पंचनामा केला असता, ५ ब्रास माती व १० ब्रास मुरुम त्यामध्ये आढळून आला. तसेच विनापरवाना मुरूम वाहतूक करणारी ३ वाहने तलाठी व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासमोरून पळून गेली. संबंधित वाहने आर. के. चव्हाण इन्फा प्रा. लि., पुणे यांची असल्याचे निष्पन्न झाले आहे.फलटण तालुक्यातील ज्या गावातून मुरूम व माती उपशाची शेतजमिनीची त्रयस्थ विभागांकडून चौकशी करण्याची आवश्यकता असून, उपसा करण्यात आलेल्या शेतजमिनीचा पंचनामा व मोजमाप करण्याची गरज असून, या तपासात बुडालेला कोट्यवधीचा महसूल उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुरुम व मातीचा नियमबाह्यपणे उपसा सुरू.....फलटण तालुक्यातील कुरवली बुद्रुक, बरड, सस्तेवाडी, नाईकबोमवाडी, भवानीनगर, राजुरी, विडणी, तरडगाव, काळज, धुळदेव, वडले, मिरढे व इतर गावांत महसूल विभागाची कोणत्याही प्रकारची परवानीशिवाय अनेक महिन्यांपासून लाखो ब्रासचा मुरूम व मातीचा उपसा सुरू असून, दिवसरात्र हजारो हायवाच्या माध्यमातून केंद्राचे पालखी महामार्गाचे काम आहे, असा दम देऊन काही परिपत्रके व आदेश दाखवून कोटीचा राज्य शासनाचा महसूल बुडवून मुरूम व मातीचा नियमबाह्यपणे उपसा सुरू आहे.