सातारा : राज्यातील राजकीय स्थित्यंतर नंतर सर्वच मतदारसंघाचे चित्र बदलले असून माढा लोकसभेसाठी ही नवीन ट्विस्ट निर्माण झालेला आहे. कारण, अजितदादा महायुतीत गेल्याने त्यांना अनेक आमदारांनी पाठिंबा दिला असून त्यातील तिघेजण माढ्यातील आहेत. त्यामुळे सर्व सहा आमदार युतीत राहणार असल्याने माढ्यात आघाडीची वजाबाकी तर युतीत बेरीज झाली आहे. तरीही अजूनही काही काठावर आहेत.माढा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माढा, सांगोला, करमाळा आणि माळशिरस हे विधानसभेचे मतदारसंघ येतात. तर सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघाचा समावेश या मतदारसंघात होतो. सध्या या मतदारसंघाचे खासदार फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार व सध्याचे करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांचा पराभव केला होता. खरेतर माढा लोकसभा मतदारसंघ पूर्वी कधीही युतीसाठी अनुकूल नव्हता. आघाडीच येथे दमदार होती. पण, भाजपच्या वाट्याला हा मतदारसंघ आल्यानंतर बेरजेचे आणि फोडाफोडीचे राजकारण करुन त्यांनी ताकद निर्माण केली. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत त्यांची डाळ शिजली. आता माढ्याच्या उमेदवारीवरून भाजप आणि राष्ट्रवादीतून कोण ? यावर चर्चा सुरू झाली होती. भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनाच उमेदवारी मिळणार असे चित्र होते. तर राष्ट्रवादीतून रामराजे नाईक-निंबाळकर दावेदार होते. मात्र, राज्यातील राजकीय भूकंपानंतर माढा मतदारसंघाचे चित्र बदलले आहे.शरद पवारांनी नेतृत्व केलेले...माढ्याच्या अस्तित्वानंतर प्रथमच २००९ ला निवडणूक झाली. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती ऐवजी माढ्यातून निवडणूक लढवत विजय मिळविला होता. त्यावेळी भाजपचे सुभाष देशमुख यांचा पराभव केलेला. तर २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विजयसिंह मोहिते-पाटील यांनी विजय मिळवला.
माढा मतदारसंघात आघाडीत वजाबाकी, युतीसाठी बेरीज; राजकीय भूकंपानंतर चित्र बदललं
By नितीन काळेल | Published: July 10, 2023 7:26 PM