मलटण :
बाल दिवस सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या भाषण आणि पत्रलेखन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा निंबळक (ता. फलटण) येथील स्वराज महेश ननवरे आणि कल्याणी सचिन सावंत यांनी तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला.
भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त ८ ते १४ नोव्हेंबर या कालावधित बालदिवस सप्ताह साजरा करण्यात आला. कोरोनाकाळात शाळा बंद असल्या तरी मुलांच्या सुप्त गुणांना चालना मिळावी, या हेतूने शिक्षण विभागाने विविध प्रकारच्या स्पर्धांचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन केले होते.
यात ‘मी नेहरू बोलतोय’ या विषयावरील भाषण स्पर्धेत पहिली, दुसरी या गटात स्वराजने तालुक्यात द्वितीय क्रमांक, तर ‘चाचा नेहरू यांना पत्र’ या विषयावर तिसरी ते पाचवी या गटात कल्याणी हिने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला. वर्गशिक्षक रवींद्र जंगम, धोंडिराम बुधावले यांनी या मुलांना मार्गदर्शन केले.
शाळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पंचायत समिती सभापती शिवरुपराजे खर्डेकर, पंचायत समिती सदस्य संजय कापसे, गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे, शिक्षण विस्तार अधिकारी सी. जी. मठपती, केंद्रप्रमुख दारासिंग निकाळजे, मुख्याध्यापक शारदा निंबाळकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास भोईटे, सदस्य, शिक्षक, ग्रामस्थ यांनी कौतुक केले.