वाई : ‘स्पर्धेच्या युगात तांत्रिक, व्यवसायाभिमुख शिक्षणाचे महत्त्व वाढले आहे. सर्व प्रकारच्या संधी कौशल्यावर आधारित झाल्या आहेत. क्रीडा क्षेत्रात आवडीच्या खेळात मेहनत घेतल्यास यश मिळू शकते. अंगभूत कौशल्य ओळखून चालना दिल्यास यश हमखास मिळते,’ असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अशोक सरकाळे यांनी केले.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित श्री नरसिंह हायस्कूल, धोम येथे ऑलिम्पिक विजेते खेळाडूंच्या स्फूर्ती फलकाच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मुख्याध्यापक प्रकाश मुसळे, नरसिंह स्पोर्ट्स ॲकॅडमीचे प्रमुख दत्तात्रय देसाई उपस्थित होते. विद्यालयात नीरज चोप्रा व अन्य पदक मिळवणाऱ्या खेळाडूंच्या फलकाचे अनावरण या वेळी करण्यात आले.
मुख्याध्यापक प्रकाश मुसळे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळावर लक्ष केंद्रित करावे. आपल्यातही ऑलिम्पिक पदक मिळवण्याची क्षमता आहे. ते सत्यात उतरवण्यासाठी कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे.’
क्रीडा शिक्षक दत्तात्रय देसाई यांनी विद्यालयाच्या वतीने उपलब्ध कबड्डी, भालाफेक, मुलींची कुस्ती, ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात विद्यालयात असणाऱ्या सर्व आधुनिक सोयी-सुविधांविषयी माहिती दिली. कार्यक्रमास वैभव देसाई, वैभव जाधव, नाना चिंचकर, उत्तम झांजुर्णे, तसेच वाई तालुका शिक्षकेतर संघटना उपाध्यक्ष दत्तात्रय महांगडे उपस्थित होते. कृष्णा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी सुरवसे यांनी आभार मानले.