लोणंद : ‘पालखी काळात वारकऱ्यांना कोणत्याही सुविधांची कमतरता भासू देऊ नका. पालखी सोहळ्यात वारकरी व भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मिळाव्यात. प्रत्येक विभागाने समन्वय ठेवून प्रामाणिकपणे नियोजन केल्यास आपण हा सोहळा यशस्वीरीत्या पार पाडू,’ असा विश्वास विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी व्यक्त केला.
नीरा येथील दत्त घाटाची पाहणी केल्यानंतर लोणंदच्या पालखी तळाची पाहणी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, वाई उविभागीय आधिकारी संगीता चौगुले व खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे, बांधकाम विभागाचे अधिकारी एस. वाय. मोदी यांनी पालखी काळात करण्यात येणाºया कामांची माहिती दिली.
दरम्यान, पालखी सोहळा नियोजनासंदर्भात आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, लोणंद नगरपंचायत, महावितरणचे अधिकारी यांची संयुक्त बैठक लोणंद नगरपंचायत येथे अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी वाई उविभागीय आधिकारी संगीता चौगुले, खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे, लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ताम्हाणे, नगराध्यक्ष सचिन शेळके, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी व सर्व विभागांचे अधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड म्हणाले, ‘सर्वच विभागांनी समन्वयाची भूमिका घेऊन वारकºयांना सुख सुविधा मिळवून द्यावी. यावेळी लोणंदमध्ये एकच मुक्काम असल्याने दर्शनासाठी फार मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. वाहतूक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था आणि दर्शनरांगेचे योग्य नियोजन करण्यात यावे. प्रत्येक विभागाला कामाचे नियोजन लिखित रुपात देण्यात यावे, अशा सूचना केल्या. कंट्रोल रूम, वारकºयांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी दिशादर्शक नकाशे, फ्लेक्स, रोडचे नकाशे लावण्यात यावेत. खाद्यपदार्थ व स्वच्छ पाण्यासाठी पाण्याचे नमुने घेण्यात येऊन वारीकाळात मुबलक स्वच्छ पाण्याची सोय करावी. लोणंद नगरपंचायतीने दर्शनरांगेचे योग्य नियोजन करून शहर स्वच्छ ठेवण्यावर भर द्यावा.’तसेच कायदा व सुव्यवस्थता राखण्यासाठी व वाहतूक व्यवस्था, पार्किंगसंदर्भात लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी सविस्तर माहिती दिली.
तात्पुरत्या शौचालयांची सातशे युनिट बसविणारशासनाच्या ‘निर्मल वारी व स्वच्छ वारी’ या योजनेंतर्गत वारी निर्मल व स्वच्छतेत तसेच आनंदाच्या वातावरणात पार पडावी. सर्वांनी सहकार्य करावे. यासाठी माउलींच्या पालखी मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या शौचालयांच्या सातशे युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे.-संगीता चौगुले, वाई उविभागीय आधिकारी