कुडाळ : जावळी तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत असणाऱ्या जवळवाडी (ता. जावळी) येथे ग्रामपंचायत व भैरवनाथ तरुण मंडळ जवळवाडी यांच्या वतीने निर्माल्यदानाचा यशस्वी उपक्रम राबविला जात आहे. यावर्षीही घरगुती गणेश विसर्जनाच्या दिवशी सर्व ग्रामस्थ व महिलांनी निर्माल्यदान करून समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवत पर्यावरणपूरक भूमिका बजावली आहे.
जवळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षा जवळ यांच्या संकल्पनेतून निर्माल्य करूया दान, नदी होणार नाही घाण, आपली वेण्णामाई स्वच्छ ठेवूया या भावनेतून व विचारातून ग्रामस्थ व युवक आणि महिला यांच्यासमोर दोन वर्षांपूर्वी हा विचार मांडला. याला विधायक प्रतिसाद देत पर्यावरणाचे प्रदूषण रोखण्याच्या या उपक्रमाला सर्वांचीच साथ मिळावी. हा विचार मांडून न थांबता येथील ग्रामस्थ व युवकांनी गेल्या तीन वर्षांपासून याची प्रत्यक्षात अंमलबजावणीही केली आहे.
या माध्यमाने ट्रॅक्टरची-ट्राॅली भरून निर्माल्य जमा होत असते. याच्यातून ओला व सुका अशी विभागणी करून यापासून खतनिर्मिती केली जाते. गत दोन वर्षांत तयार झालेले खत मंदिर व शाळा परिसरात लावण्यात आलेल्या झाडांना वापरण्यात आले आहे. यामुळे परिसरातील झाडांचीही चांगली वाढ झाली आहे. गावातील भैरवनाथ तरुण मंडळाचे कार्यकर्ते-युवक व महिला यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतल्यानेच हा उपक्रम यशस्वी झाला आहे.
कोट:
पर्यावरणपूरक उपक्रमांची गरज..
निर्माल्यदान उपक्रम प्रत्येक गावागावात राबविल्यास गणेश विसर्जनानंतर पाण्यावर तरंगणारे निर्माल्य व चित्र-विचित्र स्वरूप आणि पाणी प्रदूषण कमी करण्यास नक्कीच मदतच होईल. अशा पर्यावरणपूरक उपक्रमांची सुरुवात आपण स्वतःपासून केल्यास परिसर स्वच्छ सुंदर व निरोगी राहील.
-वर्षा जवळ, सरपंच, जवळवाडी
फोटो: जवळवाडी (ता. जावळी) येथे तीन वर्षांपासून निर्माल्यदान उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. (छाया : विशाल जमदाडे)