वाई : ‘कोरोनाच्या संकटात आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. योगा, प्राणायाममुळे आरोग्य निरोगी होऊन प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. नियमित योगसाधना केल्यास प्रतिकार शक्ती वाढून कोरोनावर मात शक्य आहे,’ असे प्रतिपादन योगा शिक्षिका प्रिया चव्हाण यांनी केले.
योगविद्या धाम सातारा शाखेच्या वतीने आयोजित कोरोनाबाधित रुग्णांकरिता योग शिबिरात त्या बोलत होत्या.
चव्हाण म्हणाल्या, ‘अनेक रुग्णांना योगाचा फायदा झाला असून, त्यांनी कोरोनावर मात केली आहे. दहा दिवसांच्या मोफत शिबिरामध्ये बारा वर्षांवरील कुटुंबातील सर्व सदस्यांनी या शिबिरात सहभाग घेऊन दहा दिवसांनंतर सर्वांच्या प्रतिक्रिया आणि अनुभव खूप छान मिळाले. काही लोकांना योगासनांची आवड निर्माण झाली. योगसाधना शिबिर नुकतेच पार पडले. या शिबिरात साधारण दोनशेच्या आसपास साधक सहभागी झाले होते.
वाई येथील योगशिक्षक प्रिया चव्हाण यांनी हे शिबिर घेतले. त्यांना सहशिक्षक म्हणून नीलम बोबडे यांनी सहकार्य केले. शिबिरामध्ये वाईमधील ३६ साधक, सातारा, पुणे, मुंबई, राजस्थान, यवतमाळ, लातूर, फलटण, कऱ्हाड, सांगली येथील मिळून दोनशेहून अधिक प्रशिक्षणार्थी होते. शिबिर ऑनलाईन पद्धतीने घेतले. या शिबिरात कोरोनामुक्त लोकांकडून त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेनुसार योगाभ्यास करून घेण्यात आला. या अभ्यासक्रमात पूरक हालचाली, आसने, ओंकार साधना, श्वसनाचे प्रकार या यौगिक क्रियांचा समावेश होता. सर्व साधकांनी योगसाधना नियमितपणे सुरू ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी प्रिया चव्हाण व नीलम बोबडे यांना संस्थेच्या अध्यक्षा शैलजा ठोके, उपाध्यक्ष वैशाली भोसेकर यांनी मार्गदर्शन केले.