सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी मोहीम राबवली. त्यावेळी सुमारे ३० जण उशिरा आल्याचे आढळले. त्यांना समज दिली असून, दुसऱ्यांदा सापडल्यास कारवाई होणार आहे. तर ठराव समितीत विविध विषयांवर चर्चा झाली.सातारा जिल्हा परिषदेला नावलौकिक आहे. याठिकाणी ग्रामीण भागातून नागरिक विविध कामांसाठी येतात. कामे वेळेत व्हावीत हीच अपेक्षा त्यांची असते. पण, अनेकवेळा त्यांना कर्मचारी वेळेवर येत नसल्याचा अनुभव असतो. तर काही दिवसांपूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा ज्ञानेश्वर खिलारी यांनी पदभार घेतला आहे. त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी सोमवारी सामान्य प्रशासन विभागाला कर्मचारी वेळेत कार्यालयात आलेत का? याची तपासणी करण्याची सूचना केली. सकाळी साडेदहाच्या सुमारास ही मोहीम राबविली. त्यावेळी तब्बल ३० जण उशिरा आल्याचे आढळले. शिक्षण, आरोग्य, बांधकामसह इतर विभागातील हे कर्मचारी होते. या कर्मचाऱ्यांना आता समज दिली आहे. पण, दुसऱ्यांदा उशीर झाल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली ठराव समितीचीही सभा झाली. यावेळी विविध विषय चर्चेला होते. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या शिस्तीचाही विषय समोर आल्यानंतर खिलारी यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. तसेच समितीत स्थगिती उठवलेली कामे सुरू करण्याबाबतही चर्चा झाली, अशी माहिती मिळाली.
सातारा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची अचानक तपासणी मोहीम, ३० ‘लेट लतीफ’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 1:01 PM