सातारा : खेलो इंडीया राष्ट्रीय युथ गेम्स स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील खरशी गावची सुवर्णकन्या सुदेशना हणमंत शिवणकर हिने १०० मीटर धावणे मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत सुवर्ण पदक मिळविले. सुदेशनाने मिळविलेल्या यशाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.अत्यंत प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या "४थ्या खेलो इंडीया राष्ट्रीय युथ गेम्स स्पर्धेचे आयोजन दि. ३ ते १३ जून २०२२ या कालावधीत हरियाना - पंचकुला येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील "खरशी" गावची कन्या सुदेशना हणमंत शिवणकर महाराष्ट्राच्या एँथलेटिक्स संघातून सहभागी झाली आहे. सुदेशना १०० मीटर धावणे, २००मीटर धावणे ४ बाय १०० मीटर धावणे रिले या क्रीडा प्रकारामध्ये सहभागी झाली आहे. आज ७ जून २०२२ रोजी झालेल्या १०० मीटर मध्ये सुदेशनाने सुवर्ण पदक मिळवित उत्कृष्ट कामगिरी केली आहे.हॅट्रिकची संधीसुदेशना ४ बाय १०० मीटर रिले स्पर्धा व बुधवारी २०० मीटर धावणे स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे. सुदेशना शिवणकरला सुवर्ण पदकांची हॅट्रिक करण्याची संधी आहे.जागतिक ज्युनिअर एँथलेटिक्स स्पर्धेसाठी संधीसुदेशना शिवणकर हिने १०० मीटर मध्ये ११.७९ सेकंदाची उत्कृष्ट वेळ नोंदवली आहे. तिची ही वेळ जागतीक ज्युनिअर एथलेटिक्स स्पर्धा कोलंबिया- केली या स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. भारतीय एथलेटिवस महासंघ आणि भारतीय प्रशासकीय क्रीडा विभाग तिला जागतिक ज्युनिअर एँथलेटिक्स स्पर्धेसाठी सहभागी होण्यासाठी नक्की संधी देईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सध्या राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि ऑलंम्पिक स्तरावरील एथलेटिक्सच्या धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन हे सिंथेटिक ट्रॅकवर होत असते. मला सिंथेटिक ट्रॅकवर धावण्याच्या सरावाची सवय असावी म्हणून माझे वडील कोल्हापूर, पुणे येथे सिंथेटिक्स ट्रॅक वरती सराव करण्यासाठी महिन्यातून २ ते ३ वेळा स्वतःच्या खर्चाने घेऊन जातात. सातारा मध्ये सिंथेटिक ट्रॅक झाल्यास जिल्ह्यातील खेळाडूंना त्याचा नक्की चांगला फायदा होऊ शकतो. - सुदेशना शिवणकर, सुवर्णपदक विजेती